मनमोहन सिंहांनी मुंडेंना काँग्रेसमध्ये घेतलं नाही, अजित पवारांचा गौप्यस्फोट

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Tuesday, 7 February 2017 3:40 PM
मनमोहन सिंहांनी मुंडेंना काँग्रेसमध्ये घेतलं नाही, अजित पवारांचा गौप्यस्फोट

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे पक्ष सोडण्याच्या तयारीत होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांनी पक्षातील निष्ठावानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि मराठा मोर्चापासून घराणेशाहीपर्यंत अनेक विषयांवर ‘माझा कट्टा’वर दिलखुलास मतं व्यक्त केली.

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात होते. त्यांच्यासोबत पाशा पटेल, माधुरी मिसाळ, प्रकाश शेंडगे, पंकजा मुंडे असे चार-पाच आमदारही मुंडेंसोबत पक्ष सोडणार होते. मात्र मुंडे हे लोकसभेचे उपनेते होते, अशाप्रकारे पक्ष फोडायचा नसतो, असं मत व्यक्त करत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मुंडेंना पक्षात घेतलं नाही.

पक्ष सोडण्याची संपूर्ण तयारी झाली होती. त्यावेळी भाजपच्या ज्येेष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी समजूत घातली आणि मुंडेंनी निर्णय बदलला, असा दावा अजित पवारांनी केला. मुंडेंसोबत इतर आमदार जाऊ नयेत, यासाठी देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यासारखे भाजप नेते प्रयत्नशील होते, असंही त्यांनी सांगितलं. माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या काळात भाजप आतासारखी नव्हती, असं मतही अजित पवारांनी व्यक्त केलं.

आमदार धनंजय मुंडे यांचे पिता पंडित अण्णा मुंडे यांनी भेट घेतली होती. त्यावेळी काही घटना घडतात, गोपीनाथ मुंडेंना सोडू नका, असा सल्ला मीच धनंजय मुंडेंना दिला होता, असंही अजित पवार म्हणाले. मात्र वर्षभरानंतर त्यांनी पुन्हा माझी भेट घेतली. आपल्याला त्या पक्षात (भाजप) राहायचंच नाही, राष्ट्रवादीत प्रवेश मिळणार नसेल, तर आपल्यासाठी इतर पक्षांची दारं उघडी आहेत, असं धनंजय मुंडेंनी सांगितल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला, असंही अजित पवार म्हणाले.

पवारांना पाहून मुंडेंनी वाढदिवस ठरवला

गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचाही वाढदिवस 12 डिसेंबरला असल्याचा सार्वत्रिक समज आहे, मात्र तपशील काढून पाहिल्यास मुंडेंनी जन्मतारीख बदलल्याचं समजेल, असा गौप्यस्फोटही अजित पवार यांनी केला. गोपीनाथ मुंडे यांची खरी जन्मतारीख त्यांच्या आई-वडिलांना ठाऊक नव्हती. 1980 च्या

सुमारास पवारांभोवती वलय होतं. त्यांचा वाढदिवस राज्यभरात उत्साहाने साजरा केला जातो, हे पाहूनच मुंडेंचा वाढदिवस 12 डिसेंबर जाहीर करण्यात आला, ही माहिती खुद्द धनंजय मुंडेंनी दिली आहे, असा दावाही अजित पवारांनी केला.

सत्तेच्या हव्यासाने निष्ठावान दुरावले

सत्तेच्या हव्यासातून अनेक हौशे-नवशे सत्ताधारी पक्षासोबत घुटमळतात, याचा आपल्याला अनुभव आल्याचं अजित पवारांनी ‘माझा कट्टा’वर सांगितलं. हल्ली ‘गद्दार’ या शब्दाला जास्त महत्त्व आलं आहे, हे सांगताना अनिल भोसलेंच्या बाबतीत निष्ठेपेक्षा नातं वरचढ ठरलं असावं, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजप जेव्हा सत्तेतून बाहेर पडेल, तेव्हा भाजपच्या नौकेत नाही तर ‘क्रूझ’मध्ये बसलेलेच आधी उड्या मारतील, अशी मिष्किल टिपणीही त्यांनी केली.

ज्यांच्याशी कौटुंबिक जवळीक होती, त्यांनी पक्ष सोडला नसता तर बरं झालं असतं, अशी खंतही अजित पवारांनी व्यक्त केली. मात्र काही जणांनी पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादी स्वच्छ झाली, हे एका अर्थी बरं झालं, असं सांगायलाही ते विसरले नाहीत. जवळच्या माणसांनी त्रास दिल्याचे दाखले शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आले आहेत, असंही अजित पवार म्हणाले.

पवारांचे सर्वांशी मित्रत्वाचे संबंध

गोरगरीबापासून टॉपच्या उद्योजकांपर्यंत, साहित्य, कला, उद्योग अशा सर्व क्षेत्रातील माणसांशी शरद पवारांचे चांगले आणि जवळचे संबंध आहेत. विरोधीपक्षात असतानाही मनोहर जोशी, बाळासाहेब ठाकरेंशी पवारांचे मित्रत्वाचे संबंध होते. विरोधकांना मदत करणं हा शरद पवारांच्या स्वभावाचा भाग आहे. कारण राजकीय मतभेद असले तरी ते आपले दुश्मन नाहीत, असंच पवारांचं मत असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

भ्रष्टाचारमुक्ती, काळा पैसा आणि खोट्या नोटा या मुद्द्यांवरुन नोटाबंदीला पाठिंबा दिला होता, मात्र नोटाबंदीच्या 50 दिवसांनंतर त्याचे दूरगामी दुष्परिणाम दिसल्याने त्याला विरोध केला, अशी भूमिकाही अजित पवारांनी मांडली.

पुन्हा निवडणुका नको म्हणून भाजप सरकारला राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिंबा जाहीर केला होता. याचा अर्थ आम्ही सरकारमध्ये नाही गेलो, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांबद्दल काय बोलावं, हा त्यांचा अधिकार आहे. परंतु भाजप आणि राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी असून सर्वधर्मसमभाव हाच राष्ट्रवादीचा भाव आहे, असं सांगताना शिवसेना-भाजपमध्ये भांडण लावल्याने
आमचा राजकीय फायदा झाल्याचं म्हणत त्यांनी हशा पिकवला.

मुंबईत चेहरा देण्यात अयशस्वी

ज्या महापालिकांमध्ये राष्ट्रवादी विरोधीपक्षात आहे, तिथे प्रचाराची दिशा वेगळी असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. मुंबईत आधीच आम्ही संख्येने कमी, त्यात काँग्रेसशी आघाडी न करता लढत आहोत. कचरा, पाणी, झोपडपट्टी, घरं, वाहतूक हे प्रश्न मुंबई शहरात महत्त्वाचे आहेत, असं अजित पवार म्हणाले.  ठाण्यात वसंत डावखरे, जितेंद्र आव्हाड यांना नेतृत्व सोपवलं, मात्र मुंबईत राष्ट्रवादीला चेहरा देण्याच्या बाबतीत आम्ही अयशस्वी ठरलो, याची कबुलीही अजित पवारांनी दिली. देशात नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यामुळेच केवळ भाजप सत्तेवर निवडून आली, असा टोलाही त्यांनी लगावला. सिंहगडावर जाऊन शपथ घेणं म्हणजे भाजपची नौटंकी असल्याची टीकाही यावेळी अजित पवारांनी केली.

माझ्या मुलांनी राजकारणात येऊ नये

माझ्या मुलांनी राजकारणात येऊ नये, असं माझं वैयक्तिक मत असल्याचं अजित पवार म्हणाले. राजकारणात आल्यानंतर कौटुंबिक आयुष्य उरत नाही, आपण पब्लिक फिगर होऊन जातो, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. पुतण्या रोहितने स्वतः राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली, त्याबाबत शरद पवारांशी बोलल्यानंतर त्याला तिकीट दिल्याचंही अजित पवारांनी सांगितलं. पुतण्या चांगल्या मताधिक्याने निवडून येईल, याची खात्रीही अजित पवारांनी व्यक्त केली.

राज ठाकरे कमी पडले

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सुरुवातीला जनतेने संधी दिली, पहिल्या फटक्यात मुंबई-पुणे-नाशिक सारख्या शहरात इतके आमदार कोणत्याच पक्षाचे निवडून आले नव्हते. तरुणांमध्ये त्यांच्या भाषणाची क्रेझ होती. मात्र संघटनकौशल्यात राज ठाकरे काहीसे मागे पडले, अजित पवारांनी सांगितलं.

कायद्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, घोटाळ्याच्या चौकशीला सामोरे जाण्याची आमची कायमच तयारी आहे. मात्र क्लीन चिट मिळाली की चौकशी करणाऱ्यांशी साटंलोटं असल्याचा आरोप होतो, आणि दोषी सिद्ध झालो, तर भ्रष्टाचार केला म्हणूनच अडकले, अशी दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा दावाही अजित पवारांनी केला.

सेना-भाजपच्या काळात कायद्याचे तीनतेरा

शिवसेना-भाजपच्या कार्यकाळात राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचा घणाघातही अजित पवारांनी केला. भोरमधील पोलिस निरीक्षकाला झालेल्या मारहाणीचा उल्लेख करत पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत होतेच कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पोलिसांबाबत जनसामान्यांच्या मनात आदरयुक्त दबदबा निर्माण व्हायला हवा, असं मतही अजित पवारांनी व्यक्त केलं. पोलिसांवर हात
उचलणारा कुठल्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख उजवे असल्याचं मतही अजित पवारांनी व्यक्त केलं. संघटनकौशल्य, जनसंपर्क यामध्ये विलासरावांचा हातखंडा असल्याचं ते म्हणाले. माझा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस एकत्र 22 जुलैलाच असतो. त्यांच्याशीही चर्चा होते. मात्र त्यांना अद्याप सत्ताधारी पक्षात असल्याची सवय झालेली नाही, मुख्यमंत्री बेंबीच्या देठापासून उगाच ओरडतात, असंही अजित पवार म्हणाले.

गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतातच, पक्षस्थापनेनंतर 15 वर्ष सत्तेत असल्याने अनेक जण चिकटले. पडत्या काळात सोबत असलेल्या निष्ठावानांनाच सोबत घेणार, हे सत्ता गमावल्यानंतरच्या अनुभवांतून शिकल्याचं अजित पवारांनी नमूद केलं.

First Published: Tuesday, 7 February 2017 3:14 PM

Related Stories

‘पनवेल’ जिंकण्यासाठी महाआघाडी, शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र
‘पनवेल’ जिंकण्यासाठी महाआघाडी, शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी...

पनवेल : 24 मे रोजी होणाऱ्या पनवेल महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी

डेंटल कॉलेज-वसतिगृहासाठी रामदास कदमांनी जमीन हडपली?
डेंटल कॉलेज-वसतिगृहासाठी रामदास कदमांनी जमीन हडपली?

मुंबई/रत्नागिरी : शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम

आता नववीत नापास होणाऱ्यांचीही पुन्हा परीक्षा
आता नववीत नापास होणाऱ्यांचीही पुन्हा परीक्षा

मुंबई : नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने राज्य सरकारने

जनतेतून थेट सरपंच निवडण्याचा प्रस्ताव, पंकजा मुंडेंची माहिती
जनतेतून थेट सरपंच निवडण्याचा प्रस्ताव, पंकजा मुंडेंची माहिती

नांदेड : नगराध्यक्षांप्रमाणे आता सरपंचही थेट जनतेमधून निवडण्याचा

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/04/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/04/2017

सर्वात मोठ्या #हुंडाबदी परिषदेनंतर, आता #तूर प्रश्नी एबीपी माझाचं

रेल्वे टॉयलेटमधून पडूनही बचावलेल्या बाळाचा आईसह मृत्यू
रेल्वे टॉयलेटमधून पडूनही बचावलेल्या बाळाचा आईसह मृत्यू

रायगड/मुंबई : रत्नागिरी-दादर ट्रेनच्या टॉयलेटमधून पडूनही

नागपुरात जिम ट्रेनरची आत्महत्या, महिला पोलिसावर गुन्हा
नागपुरात जिम ट्रेनरची आत्महत्या, महिला पोलिसावर गुन्हा

नागपूर : नागपुरात एका नामांकित जिममधील ट्रेनरने गळफास लावून

जय वाघाच्या बेपत्ता बछड्याची शिकार, श्रीनिवासनचा मृतदेह आढळला
जय वाघाच्या बेपत्ता बछड्याची शिकार, श्रीनिवासनचा मृतदेह आढळला

चंद्रपूर : चंद्रपुरात काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या जय

तुमची संघर्षयात्रा, तर आमची संवादयात्रा : मुख्यमंत्री
तुमची संघर्षयात्रा, तर आमची संवादयात्रा : मुख्यमंत्री

पिंपरी : शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत, ते

अकोल्यात मृत शेतकऱ्याच्या नावे तूर खरेदी
अकोल्यात मृत शेतकऱ्याच्या नावे तूर खरेदी

अकोला: राज्यभरात तूर खरेदी गाजलीय ती गडबड आणि गोंधळामुळे. अकोला