एपीआय अश्विनी गोरे दीड वर्षांपासून बेपत्ता, वरिष्ठ अधिकाऱ्यावर संशय

पोलिस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलिस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली.

एपीआय अश्विनी गोरे दीड वर्षांपासून बेपत्ता, वरिष्ठ अधिकाऱ्यावर संशय

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून मुंबई इथल्या कळंबोलीतून महिला पोलिस अधिकारी बेपत्ता झाली आहे. मात्र या प्रकरणाचा तपास करण्यास पोलिसच टाळाटाळ करत असल्याचा आरोप महिला पोलिस अधिकाऱ्याच्या वडील आणि पतीने केला आहे. या सहाय्यक पोलिस निरीक्षक असलेल्या या महिला अधिकाऱ्याचा तिच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानेच घातपात केला असावा असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?
15 एप्रिल 2016 पासून अश्विनी राजू गोरे या महिला पोलिस अधिकारी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या आहेत. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी तिला बेपत्ता केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या तपासात पोलिसच त्याना सहकार्य करत नसल्याचा आरोप अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक महत्त्वकांक्षी तरुणी अश्विनी जयकुमार बिद्रे या 2000 वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. याचदरम्यान त्यांचा विवाह 2005 साली हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं.

पोलिस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलिस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर हे अश्विनीला भेटण्यासाठी वांरवार येत होते. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं.

अश्विनी आणि अभय यांच्यात वाद
यावेळी अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरांनी अश्विनी यांच्या पतीला गायब करण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचं कुटुंब व्यथित झालं होतं. या काळातच 2015 साली अश्विनी यांची बदली कळंबोली पोलिस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत या आशयाचं पत्र पोलिस खात्यानेही पाठवलं. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी कळंबोली पोलिसात याची तक्रार दाखल केली.

अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनीने आपल्या संगणकात रेकॉर्ड करुन ठेवले होते. अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या. अभय कुरुंदरकांनी भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं उघड झालं. हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देताच अभय करुंदकर हे तात्काळ रजेवर गेले. गेल्या महिन्यात ते पुन्हा रुजू झाले, मात्र पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी अद्यापही ताब्यात घेतलं नाही.

पोलिस प्रकरण दडपत आहेत?
या प्रकरणी अश्विनीच्या कुटुंबीयांनी राज्याचे पोलिस महासंचालक यांची भेट मागितली होती. मात्र त्यांना ती मिळाली नाही. उलट त्यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्तांना भेटा, असा SMS द्वारे सल्ला दिला. पोलिस या प्रकरणात कोणतीच मदत करत नसल्याचा आरोप अश्विनीच्या घरच्यांनी केला आहे.

एक महिला पोलिस अधिकारी गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता होते. तिचा कोणताच तपास लागत नाही. तिला बेपत्ता करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात पुरावे सादर केले जातात, मात्र तरीही त्याला तब्यात घेतलं जात नाही. यावरुन पोलिस दलातील अधिकारीच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.

सदरक्षणाय, खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य असणाऱ्या पोलिस दलातील खलनायकांच्या प्रवृत्तीमुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यानी या प्रकरणात गांर्भियाने लक्ष घालून आपणाला न्याय द्यावा, अशी मागणी गोरे आणि बिद्रे कुटुंबीयांच्या वतीने केली जात आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: API Ashwini Gore goes missing, kin approach police after 1.5 year
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV