औरंगाबादची कचराकुंडी, दानवे, हरिभाऊ बागडे, ग्रामस्थांशी चर्चा करणार

राजकीय नेते आज नारेगावच्या ग्रामस्थांशी चर्चा करुन कचराकोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

औरंगाबादची कचराकुंडी, दानवे, हरिभाऊ बागडे, ग्रामस्थांशी चर्चा करणार

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात कचऱ्याचा प्रश्न एवढा गंभीर झाला आहे, की नागरिकांना तोंडाला रुमाल लावून रस्त्याने चालावं लागत आहे. त्यामुळे महापालिकेने दोन लाख मास्क मागवले आहेत. राजकीय नेते आज नारेगावच्या ग्रामस्थांशी चर्चा करुन कचराकोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

कचरा डेपोच नसल्यामुळे औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. औरंगाबाद शहरात गेल्या 7 दिवसांपासून अभूतपूर्व कचराकोंडी निर्माण झाली आहे. नारेगाव इथल्या डेपोत कचरा टाकला जायचा. मात्र त्याठिकाणी कचरा टाकणं बंद केल्यानंतर पर्यायी जागा उपलब्ध करून घेण्यात औरंगाबाद महापालिकेला अपयश आलं आहे.

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, औरंगाबादचे पालकमंत्री दीपक सावंत कचऱ्याचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांना यश येतं का हे पाहणं महत्वाचं आहे. कारण, शहरातील नागरिकांना रस्त्याने चालणंही कठीण झालं आहे. नारेगाव हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघातील गाव आहे.

गेल्या सात दिवसात अंदाजे 3 हजार टन कचरा शहरात ठिकठिकाणी साचला आहे.  परिस्थिती गंभीर बनत असल्यामुळे महापालिकेने डॉक्टरांच्या रजाही रद्द केल्या आहेत. सर्वसामान्य औरंगाबादकर तसंच खासगी रुग्णालयांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे.

देश-विदेशातले पर्यटक औरंगाबाद शहरातलं हे घाणेरडं चित्र पाहत आहेत. शहरातील रस्ता असो वा गल्लीबोळ, सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. सलग सातव्या दिवशीही कचराकोंडीवर तोडगा काढण्यात औरंगाबाद महापालिका अपयशी ठरली आहे. नारेगावला जिथे महापालिकेचा कचरा डेपो आहे, ते ग्रामस्थ अजूनही डेपोत कचरा न आणू देण्यावर ठाम आहेत.

महापालिकेच्या जेवढ्या कचरा उचलणाऱ्या गाड्या आहेत, तेवढ्या गाड्या कचरा भरून उभा आहेत. मात्र हा कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न आहे. त्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी येऊ नये म्हणून, त्यावर पावडर टाकली जात आहे, पण हे किती दिवस चालणार, असा प्रश्न आहे.

तब्बल 15 वर्षांपूर्वी हायकोर्टाने नारेगावचा कचरा डेपो बंद करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेला पर्यायी जागा मिळाली नाही, त्यामुळे नारेगावचे लोक रस्त्यावर उतरले आणि शहराची कचराकोंडी झाली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: aurangabad garbage problem, leaders to discuss with naregaon villagers on issue
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV