गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राणेंना पैशाची गुर्मी, भाजपत घेऊ नका : केसरकर

जो फटका द्यायचा असतो तो जनतेने द्यायचा असतो. तो फटका दोन-तीन वेळा मिळूनही राणे सुधारलेले नाहीत, असं शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राणेंना पैशाची गुर्मी, भाजपत घेऊ नका : केसरकर

जालना : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि भ्रष्ट माणसाला भाजपने घेऊ नये, असा सल्ला शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर जालन्यात केसरकरांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.

'जो फटका द्यायचा असतो तो जनतेने द्यायचा असतो. तो फटका दोन-तीन वेळा मिळूनही राणे सुधारलेले नाहीत. याचं ते उदाहरण आहेत. आपण महाराष्ट्राला काय देऊ शकतो, त्यापेक्षा मला काय मिळणार होतं आणि ते मला न मिळाल्यास मी काय करु शकतो. ही पैशाच्या जोरावर चालणारी गुर्मी आहे. राणेंची ही गुर्मी महाराष्ट्रातील जनताच उतरवू शकते.' असं दीपक केसरकर म्हणाले. 'जे टीव्हीवर सांगू शकतात, आम्ही एवढे आमदार फोडणार, कशाच्या जोरावर? पैशाच्या? मग लोकशाहीला काय अर्थ राहिला.' असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

'राणे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्न येतो, तेव्हा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतात ते लक्षात घ्यायला हवं. मोदी यांचं भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स धोरण आहे. महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट व्यक्ती म्हणून कोणावर आरोप आहेत. इन्कम टॅक्समध्ये असलेला एक शिपाई आज अंबानींच्या खालोखाल बंगला बांधतो. महाराष्ट्रातील जनतेला हे गुन्हेगारीकरण दिसत नाही का?' असा सवालही केसरकरांनी उपस्थित केला.

'त्यांच्या मुलाची गाडी ओव्हरटेक करणाऱ्या सिनिअर सिटीझनला मारहाण केली जाते. मोठ्यात मोठ्या माणसाच्या अंगावर हात उचलला जातो. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा अरेतुरे उल्लेख केला जातो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? जी संस्कृती आम्ही कोकणातून हद्दपार केली, ती महाराष्ट्रात फोफावता कामा नये, रुजता कामा नये.' असं केसरकर म्हणाले.

'गुन्हेगारीकरण रोखणं ही जशी शिवसेनेची जबाबदारी आहे, तशी भाजपची आहे. कारण भाजपची केंद्रात सत्ता असल्यामुळे भाजप आमचा मोठा भाऊ आहे. राज्यात अधिक आमदार त्यांचे आहेत. त्यांना गरज आहे का अपप्रवृतीच्या माणसांना पक्षात घ्यायची. त्यांना घेतल्यास अपप्रवृत्तींना राजमान्यता मिळेल. याचा परिणाम केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारतावर होईल.' असं मतही दीपक केसरकरांनी व्यक्त केलं.

पाहा व्हिडिओ :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV