पनवेल मनपा निवडणूक : काय आहेत पनवेलची राजकीय गणितं?

पनवेल मनपा निवडणूक : काय आहेत पनवेलची राजकीय गणितं?

पनवेल (रायगड) : पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी 24 मे रोजी मतदान असून, 26 मे रोजी निकाल लागणार आहे. आठवड्याभरात मतदान असल्याने राजकीय पक्षांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेची राजकीय गणितं काय आहेत, यावर एक नजर टाकूया :

पनवेल महापालिकेची पहिलीच निवडणूक

पनवेल महापालिका रायगड जिल्ह्यातील पहिलीच महानगरपालिका असून, गेल्याच वर्षी म्हणजे 2016 साली अस्तित्वात आली. काही गावांच्या तसंच खारघरच्या समावेशावरुन झालेला वाद गाजला. मात्र, अखेर पनवेल नगरपालिकेचं महापालिकेत रुपांतर झालं. त्यामुळे महापालिकेत रुपांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे.

सर्वच महत्त्वाचे राजकीय पक्ष रणांगणात

पनवेल महापालिकेची सध्याची उलाढाल अंदाजे एक हजार कोटी रुपये आहे. येत्या काळात हा आकडा झपाट्यानं वाढणार असल्यानं सर्व पक्षांची नजर आहे. म्हणूनच राज्यातील सर्वच महत्त्वाच्या पक्षांनी निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

2019 साली राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. याच निवडणुकांची रंगीत तालिम म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

आधी शेकापमध्ये, त्यानंतर काँग्रेस आणि आता भाजपमध्ये असलेल्या प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेसाठी मोठी कसरत सुरु केली आहे. त्यामुळे ठाकूर पिता-पुत्र (प्रशांत ठाकूर आणि रामशेठ ठाकूर) आणि शेकापच विवेक पाटील यांच्यात पारंपरिक संघर्ष आहे.

पनवेल महापालिकेची थोडक्यात आकडेवारी :


  • पनवेल महापालिकेत एकूण जागा - 78

  • बहुमतासाठीचा आकडा - 40 जागा

  • एकूण प्रभाग – 20

  • एकूण उमेदवार - 418

  • मतदार - अंदाजे सव्वा चार लाख


ठाकूर पित्रा-पुत्रांची प्रतिष्ठा पणाला

सध्या नगरपालिकेत रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर या पिता-पुत्रांची सत्ता आहे. विशेष म्हणजे पनवेल महापालिकेत ज्या शेकापशी प्रशांत ठाकूर यांची मुख्य लढत असणार आहे, कधीकाळी त्याच शेकापचे प्रशांत ठाकूर हे कट्टर कार्यकर्ते होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले, तेव्हा राहुल गांधींचे कट्टर समर्थक मानले जात. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपचा रस्ता धरला आणि आता भाजपच्या माध्यमातून ‘पनवेल’ जिंकण्यासाठी शेकपविरोधात कडवी झुंज देऊ पाहत आहेत.

शेकाप विरुद्ध महाआघाडी

तिकडे शेकापने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करत ‘महाआघाडी’ची स्थापना केली आहे. या महाआघाडीने गेल्या दोन वर्षात ठाकूर पिता-पुत्रांच्या नाकी नाकी नऊ आणले आहेत.

मुख्य लढत कुणामध्ये?

माजी खासदार रामशेठ ठाकूर विरुद्ध माजी आमदार विवेक पाटील यांच्यात पारंपरिक संघर्ष असणार आहे. मात्र, शिवेसनेनेही जोरदार तयारी करत 25 वर्षात पहिल्यांदाच पनवेलमध्ये स्वबळावर लढते आहे. शिवसेनेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सोबत आहे.

गाववाले विरुद्ध कॉस्मोपॉलिटन असा संघर्षही पाहायला मिळणार आहे. खारघर, कळंबोलीमध्ये स्थानिक विकास आघाडीचं आव्हान असणार आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV