गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको, भाजप आमदारही आंदोलनात

गारपिटीनं नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे तातडीनं करा आणि नुकसान भरपाई द्या. या मागणीसाठी नागपूर-अमरावती रस्त्यावर शेतकरी आक्रमक झाले आहेत.

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको, भाजप आमदारही आंदोलनात

नागपूर : गारपिटीनं नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे तातडीनं करा आणि नुकसान भरपाई द्या. या मागणीसाठी नागपूर-अमरावती रस्त्यावर शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी याठिकाणी रास्ता रोको सुरु केला आहे.

या आंदोलनात भाजपचे आमदार आशिष देशमुखही सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: येऊन नुकसान भरपाईची पाहणी करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील आमदार आशिष देशमुख नाराज आहेत.

दरम्यान, काँग्रेस नेतेही आज गारपीटग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे हे देखील विदर्भातील गावांना भेट देणार आहेत.

राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यातील सुमारे 50 तालुक्यांमधील 1086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका बुलडाणा, अमरावती आणि जालना जिल्ह्याला बसला आहे.

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी याबाबत माहिती दिली. शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे  विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात शेतीचं आणि काढणी झालेल्या मालाचं मोठा प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीबाबत पंचनामा करण्याचे आदेश काल कृषीमंत्र्यांनी दिले होते.

या बाधित जिल्ह्यांमध्ये कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रिय पाहणी केली. महसूल प्रशासन आणि कृषी अधिकारी यांनी राज्य शासनाला नुकसानीबाबत प्राथमिक अहवाल सादर केला आहे. बाधित 11 जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, परभणी, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश आहे.

विदर्भात अमरावती, बुलडाण्याला फटका

विदर्भात गारपीट आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बुलडाणा जिल्ह्याला बसला आहे. चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदूर, मेहेकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या 10 तालुक्यातील 286 गावांमधील 32 हजार 700 हेक्टर क्षेत्रावरील हरभरा, गहू, कांदा, फळ आणि भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजणगाव सुरजी आणि चिखलदरा या आठ तालुक्यातील 270 गावातील 26 हजार 598 हेक्टर क्षेत्रावरील संत्रा, हरभरा, गहू, कांदा, भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे.

अकोला जिल्ह्याती मुर्तीजापूर, बार्शी टाकळी, अकोला, अकोट, पातूर, बाळापूर आणि तेल्हार या सात तालुक्यातील 101 गावांमधील 4 हजार 360 हेक्टरवरील संत्रा, हरभरा, गहु, कांदा या पिकांचे नुकसान झालं आहे.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील 36 गावांमधील 8 हजार 509 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. अशा पद्धतीने एकूण 1086 गावातील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, बाधित क्षेत्राच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. क्षेत्रिय स्तरावरुन पुढील दोन ते तीन दिवसात नुकसानाचा परिपूर्ण अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती पांडुरंग फुंडकर यांनी दिली.

संबंधित बातम्या :

मराठवाडा-विदर्भासाठी पुढचे 2 दिवस धोक्याचे, वादळी पावसाची शक्यता

मराठवाडा, विदर्भात पुन्हा गारपीट, परभणीत महिलेचा मृत्यू, पिकं उद्ध्वस्त

गारपिटीचा 11 जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टरला फटका

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Farmers protest on the Nagpur-Amravati road latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV