अन्नदात्यासाठी अन्नत्याग... 19 मार्चला 'किसानपुत्र' एकवटणार

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायदे (सिलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण) आहेत. त्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे, अशी माहितीही अमर हबीब यांनी दिली.

अन्नदात्यासाठी अन्नत्याग... 19 मार्चला 'किसानपुत्र' एकवटणार

मुंबई : शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी येत्या 19 मार्च रोजी राज्यव्यापी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी या आंदोलनाची हाक दिली आहे. एक दिवस उपोषण करुन ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ असे हे आंदोलन असेल.

अमर हबीब यांनी काय आवाहन केले आहे?

“अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे कुठल्या एका संघटनेचे आंदोलन नाही. आपल्या अवतीभोवती रोज आत्महत्या होताना आपण काय करु शकतो? आपण किमान सहवेदना व्यक्त करायला पाहिजे. याला उपवास म्हणा, उपोषण म्हणा वा अन्नत्याग म्हणा. आपण व्यक्तिगत करु शकता. तुमच्या संघटनेच्या नावाने करु शकता. कामावर असताना करु शकता, हवे तर एके ठिकाणी बसून करु शकता. सुजाण नागरिकांनी विशेषतः शहरात गेलेल्या किसानपुत्र व पुत्रींनी यात हिरीरीने भाग घ्यावा.”, असे किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायदे (सिलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण) आहेत. त्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे, अशी माहितीही अमर हबीब यांनी दिली.

उपोषणाची तारीख 19 मार्च का?

साहेबराव शेषराव करपे हे यवतमाळ जिल्ह्यातील चील-गव्हाण या गावचे शेतकरी. त्यांचे वडील संगीताचे जाणकार होते. साहेबरावांनीही वडिलांकडून संगीताचे धडे घेतले होते. उदरनिर्वाहाचे साधन शेती. शेती परवडत नाही. दरवर्षी तोटाच होतो. घेतलेली कर्जे फेडता येत नाही, लाईटचे बिल भरता येत नाही, हात उसने घेतलेल्या पैशांची परतफेड करता येत नाही.  म्हणून अस्वस्थ होते.

एके दिवशी पत्नी मालती व चार अपत्यांना घेऊन ते पवनार आश्रमात गेले. सविस्तर पत्र लिहिले. रात्री जेवणात विषारी औषध कालवून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. सकाळी त्या एका खोलीतून सहा शव काढावे लागले. साहेबरावांनी लिहून ठेवलेल्या पत्रात त्यांनी शेतकरी म्हणून जगणे कठीण झाले आहे असे नमूद केले होते. ते पत्र समस्त शेतकरी समाजाची दु:खद कैफियत सांगणारे होते.

साहेबराव यांच्या आत्महत्येने सारा महाराष्ट्र हादरून गेला होता. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी या आत्महत्येची गंभीर दखल घ्या व धोरणे बदला अन्यथा अशा आत्महत्त्या रोज होतील असा इशारा दिला होता.

ही पहिली जाहीर झालेली शेतकऱ्याची आत्महत्या. ती साहेबराव करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी केली होती. या 19 मार्चला त्यास 32 वर्ष होतात. म्हणून उपवासासाठी 19 मार्च ही तारीख निवडण्यात आली असल्याची माहिती अमर हबीब यांनी दिली.

अमर हबीब सहकऱ्यांसोबत पवनारमध्ये उपोषणाला बसणार

पवनार येथे स्वत: अमर हबीब यांच्यासोबत प्रशांत हमदापुरकर, अभिजित फाळके, किशोर माथनकर, अॅड दिनेश शर्मा, ज्ञानेश वाकुडकर यांसह अनेकजण उपोषण करणार आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी याच दिवशी महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील संवेदनशील नागरिकांनी एक दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. या वर्षीही हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तेव्हा या वर्षीही 19 मार्चला हे आंदोलन होणार आहे.

शेती शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kisanputra agitation on 1
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV