कोपर्डी निकाल: 6 मिनिटात कोर्ट रुममध्ये काय झालं?

कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती.

कोपर्डी निकाल: 6 मिनिटात कोर्ट रुममध्ये काय झालं?

अहमदनगर संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सर्व तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला.

जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास दीड वर्षे हा खटला चालला. या दीडवर्षाच्या युक्तीवादानंतर आज अवघ्या 6 मिनिटात निकाल देण्यात आला.

खचाखच भरलेल्या न्यायालयात टाचणी पडल्याचाही आवाज येईल, अशी शांतता होती.

अवघ्या 6 मिनिटात न्यायालयात काय झालं?

न्यायाधीश सुवर्णा केवले सकाळी 11 वा. 23 मिनिटांनी न्यायालयात दाखल झाल्या. तीनही आरोपी जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ यांना कठड्यात बसवण्यात आलं होतं, त्यांना न्यायाधीशांसमोर उभं करण्यात आलं.

आरोपी नंबर 1 जितेंद्र शिंदेने न्यायाधीशांकडे पाहून हात जोडले.

मग न्यायाधीशांनी सर्व आरोपींची नावं आणि वय वाचून दाखवलं. त्यानंतर न्यायाधीशांनी लगेचच शिक्षा वाचण्यास सुरुवात केली.

सर्वात आधी आरोप होते त्यामध्ये कटकारस्थान, पोक्सो, बलात्कार आणि हत्या अशा विविध आरोंपानुसार शिक्षा सुनावली.

सर्वात आधी विविध कलमांनुसार जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

यानंतर मग कलम 302 अर्थात खून आणि कलम 376 अर्थात बलात्कार यासाठी तीनही आरोपींना जन्मठेप आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेला ज्यावेळी दोषी धरण्यात आलं होतं, त्यावेळी तो म्हणाला होता शिक्षा एक दिवस काय आणि हजार दिवस काय, शिक्षाही शिक्षाच असते. मात्र आज हाच जितेंद्र शिंदे न्यायालयासमोर हात जोडून उभा होता.

ज्यावेळी कोर्टाने आरोपींना फाशी सुनावली त्यानंतर पीडित मुलीच्या आईने एकच हंबरडा फोडला.

दरम्यान, न्यायाधीशांनी आरोपींनी गुन्ह्यात वापरेले मोबाईल, दुचाकी यांचा लिलाव करण्याचेही आदेश दिले. त्याची जी रक्कम असेल, ती सरकारदप्तरी जमा होईल.

आजच्या सुनावणीसाठी आरोपींपैकी एकाचाही वकील उपस्थित नव्हता. केवळ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हेच उपस्थित होते.तीनही आरोपींना फाशी

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सर्व  तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला.

निर्भयाच्या आईची  प्रतिक्रिया

दरम्यान माझ्या छकुलीला न्याय मिळाला, पण आरोपींना फाशी मिळाली तरी  माझी छकुली परत येणार नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने व्यक्त केली.

न्यायालयाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त
कोपर्डी खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक न्यायालयात आले. त्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तब्बल एक हजार पोलिस तैनात करण्यात आले. तसंच कर्जत आणि कोपर्डी गावात ही बंदोबस्त वाढवण्यात आला.

निकाल ऐकण्यासाठी लाऊडस्पीकरची व्यवस्था
नागरिकांना उभं राहण्यासाठी पार्किंगच्या एका बाजूला व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची देखभाल दुरुस्ती केली. निकाल ऐकण्यासाठी लाऊडस्पीकरची ही व्यवस्था करण्यात आली . तर न्यायालय कक्षात खटल्याशी सबंधितांना प्रवेश देण्यात आला.

कोपर्डीत शुकशुकाट
कोपर्डी खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कोपर्डीत शुकशुकाट पसरला होता. गावकरी निकाल ऐकण्यासाठी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात दाखल झाले.

संबंधित बातम्या

कोपर्डीचा निकाल: तिघांनाही फाशीची शिक्षा

कोपर्डीचा निकाल : अॅड. उज्ज्वल निकमांनी काय माहिती दिली?

फाशीची शिक्षा सुनावताच निर्भयाच्या आईने हंबरडा फोडला!

कोपर्डीचा युक्तीवाद जसाच्या तसा : अॅड. उज्ज्वल निकम विरुद्ध तीन वकील

फाशीची शिक्षा का? उज्ज्वल निकम यांनी कोर्टात दिलेली 13 कारणं!

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: kopardi rape and murder case : what happened in ahmednagar court room
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV