'माझा' इम्पॅक्ट : समृद्धी महामार्गासाठी जमीन देणाऱ्या आजीबाईंना अखेर न्याय

अवघ्या काही तासातच आजीबाईंच्या खात्यात जमिनाच्या मोबदल्याची सर्व रक्कम जमा करण्यात आली.

'माझा' इम्पॅक्ट : समृद्धी महामार्गासाठी जमीन देणाऱ्या आजीबाईंना अखेर न्याय

ठाणे : अधिकाऱ्यांच्या मनमानीसमोर हतबल झालेल्या 90 वर्षीय आजीबाईंना एबीपी माझाच्या बातमीमुळे न्याय मिळाला आहे. जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने हतबल झालेल्या आजीबाईंनी आत्महत्येचा इशारा देत थेट मुख्यमंत्र्याकडे धाव घेतली होती. हेच वास्तव ‘एबीपी माझा’ने समोर आणलं होतं. त्यानंतर समृद्धी महामार्गाचे भूसंपादन अधिकारी खडबडून जागे झाले. अवघ्या काही तासातच आजीबाईंच्या खात्यात जमिनाच्या मोबदल्याची सर्व रक्कम जमा करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाला अजूनही शेतकऱ्यांचा विरोध आहे. शहापूर तालुक्यातील दळखण गावात राहणाऱ्या सावित्रीबाई कदम यांनी समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या जमिनीला भूसंपादनासाठी संमती देऊन जमिनीचे खरेदीखत शासनाच्या नावे करून दिले.

मात्र, त्यांना मोबदल्यासाठी सरकारी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. त्यातच समृद्धी महामार्गाचे भूसंपादन अधिकारी बाधित शेतकऱ्यांविरोधी जाणीवपूर्वक लालफितीची भूमिका घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

सरकारी अधिकारीच समृद्धीच्या मार्गात खोडा घालत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांना केला. तर आमच्याकडे जेवढी जमीन होती, ती समृद्धी मार्गात गेल्याने आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. आता सरकार आमच्या मरणानंतर जमिनीचा मोबदला देणार का? असा सवालही आजीबाईंनी ‘ एबीपी माझा’शी बोलताना उपस्थित केला होता.

एबीपी माझाची बातमी प्रसिद्ध होताच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणात जातीने लक्ष दिलं. आजीबाईंच्या नातेवाईकांशी दिवसभरातून चार वेळा संपर्क साधला. भूसंपादन अधिकाऱ्यांकडून हे प्रकरण जाणून घेत, तातडीने जमिनीचा मोबदला देण्याचे निर्देश दिल्याची माहिती आजीबाईंच्या नातेवाईकाने दिली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: land acquisition money transferred to savitribai kadam’s account
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV