महाराष्ट्राचं वैभव देश पाहणार, राजपथावर शिवरायांचा चित्ररथ!

कवी भूषण यांचं हे काव्य अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं आहे.

महाराष्ट्राचं वैभव देश पाहणार, राजपथावर शिवरायांचा चित्ररथ!

नवी दिल्ली : यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा अवतरणार आहे. ‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है । या कविराज भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या काव्याचा उद्घोष करत शिवरायांची किर्ती सांगणारा चित्ररथ राजपथावर येईल.

कवी भूषण यांचं हे काव्य अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं आहे. ज्या दिल्लीने छत्रपतींच्या स्वराज्याला कायम कमी लेखलं, ज्या दिल्लीश्वरांशी झगडण्यात शिवरायांचं आयुष्य खर्ची पडलं त्याच दिल्लीच्या मातीत अनेक राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या पराक्रमाची कीर्ती सांगणारा हा चित्ररथ दिमाखात अवतरेल.

यावेळी राजपथावर 14 राज्यांसह केंद्र सरकारच्या 7 खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे 2 चित्ररथ असे एकूण 23 चित्ररथ सादर होणार आहेत.

चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती असून त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आलेली आहे. तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती असून त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवले जातील.

या ठिकाणी आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजन दाखवले जातील.

दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे दाखवण्यात आले आहेत. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या आहेत. या चित्ररथाची संकल्पना ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Maharashtra chitrarath set to show our culture on republic day
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV