'गोकुळ'ची बदनामी कोण करतंय?

गेल्या काही दिवसात गोकुळ दूध संघावर बेछूट आरोप करुन सतेज पाटलांनी गोकुळची बदनामी केल्याचा आरोप धनंजय महाडिक यांनी केला आहे.

'गोकुळ'ची बदनामी कोण करतंय?

 

कोल्हापूर: काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्याविरोधात गोकुळ दूध संघाचे १ लाख दूध उत्पादक आज मोर्चा काढणार असल्याचा दावा, राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. या मोर्चाचं नेतृत्त्व स्वत: धनंजय महाडिक करणार आहेत.

गेल्या काही दिवसात गोकुळ दूध संघावर बेछूट आरोप करुन सतेज पाटलांनी गोकुळची बदनामी केल्याचा आरोप धनंजय महाडिक यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

राज्यामध्ये नव्हे, तर देशामध्ये अव्वल असणारा गोकुळ दूध संघ हा जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. आठ दिवसाला कोट्यवधी रुपये सभासदांना देऊन हजारो संसार फुलविणा-या संस्थेची बदनामी थांबवा. तथ्य नसणारे आरोप थांबवावेत, अशी मागणी मोर्चाद्वारे केली जाणार आहे.

सतेज पाटील यांचा मोर्चा

गोकुळ दूधसंघात मनमानी कारभार सुरु असल्याचा दावा सतेज पाटलांनी केला होता. त्यातच गोकुळने गाईच्या दुधाच्या खरेदीत 2 रुपयांची कपात केली. त्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी गेल्या महिन्यात हजारो शेतकरी आणि त्यांच्या गाई-म्हशींसह गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढला होता.

या मोर्चाला उत्तर म्हणून आता धनंजय महाडिक यांनीही मोर्चाचं आयोजन केलं आहे.

गोकुळ दुध संघावर माजी आमदार महादेवराव महाडिक गटाचे वर्चस्व आहे. महाडिक आणि त्यांच्या संचालक मंडळाने गोकुळ संघात मनमानी कारभार करत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केले आहेत.

सतेज पाटील यांचे आरोप

१)      संचालक मंडळावर वारेमाप खर्च होतो

२)     गोकुळ दुध संघात महाडिक यांचे १०० टँकर का ?

३)     गायीच्या दूध दरात 2 रुपये कपातीमुळे दूध उत्पादक शेतकरऱ्यांचं नुकसान का ?

४)     गोकुळच्या सर्वसाधारण वार्षीक सभेत प्रश्न विचारणाऱ्या आणि गैर काराभराबद्दल बोलणा-या सभासदांचा आवाज का दाबला जातो ?

५)    वारंवार निवेदने देवूनही दूध संघ त्याची दखल का घेत नाही.

असे आरोप आणि प्रश्न सतेज पाटील यांनी गोकुळ प्रश्नासनाला विचारले आहेत.

हा वाद अता राजकीय पटलावर आला असून एकमेकांचे राजकीय कट्टर वैरी खासदार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत.

सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांचा वाद

कोल्हापुरात राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेस आमदार सतेज महाडिक यांचं हाडवैर राज्याला ठाऊक आहे.

सतेज पाटील (बंटी) आणि धनंजय महाडिक (मुन्ना) हे हाडवैरी असूनही, पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत महाडिकांना पाठिंबा दिला होता. मोदी लाटेतही धनंजय महाडिक राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. त्या विजयात सतेज पाटील यांचा मोलाचा वाटा आहे, असं त्यावेळी खुद्द महाडिकांनी म्हटलं होतं.

मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचं बिनसलं आणि जवळ आलेले बंटी-मुन्ना पुन्हा वेगळे झाले. धनंजय महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत धोकेबाजी केल्याचा आरोप सतेज पाटील यांचा होता. त्यामुळे बंटी-मुन्ना पुन्हा एकदा कट्टर शत्रू झाले.

इतकंच नाही तर धनंजय महाडिक यांच्या चुलत भावाने, अमल महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन सतेज पाटील यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवलीच, शिवाय ते जिंकूनही आले.

अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे विद्यमान विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचा पराभव केला होता.

एकाच घरात तीन पक्ष

धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार असूनही जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यांचा चुलतभाऊ अमल महाडिक हे भाजपचे आमदार आहेत, तर काका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांना काँग्रेसने निलंबित केलं आहे.

म्हणजेच एकाच घरात धनंजय महाडिक (राष्ट्रवादी), अमल महाडिक (भाजप) आणि महादेवराव महाडिक (तत्कालिन काँग्रेस) असे तीन पक्ष पाहायला मिळाले होते.

http://polldaddy.com/poll/9892110/

कोण आहेत धनंजय महाडिक?

धनंजय महाडिक हे कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार आहेत. महाडिक यांनी 2004 मध्ये शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे तत्कालिन खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर त्यांनी 2009 मध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सतेज पाटील यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.

मग त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण 2009 मध्ये राष्ट्रवादीने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं नाही. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराजे छत्रपती यांच्याविरोधात प्रचार करुन, तिसऱ्या आघाडीकडून लढणाऱ्या सदाशिवराव मंडलिक यांना मदत केली. मंडलिक तेव्हा निवडून आले.

यानंतर मग धनंजय महाडिक यांना 2014 मध्ये राष्ट्रवादीने लोकसभेचं तिकीट दिलं. त्यांनी सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र आणि शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव केला. सध्या महाडिक कोल्हापूरचे खासदार आहे.

संबंधित बातम्या

गोकुळचा शेतकऱ्यांना झटका, गायीच्या दूध खरेदीदरात 2 रुपयांची कपात!

सतेज पाटलांचा 'गोकुळ'वर मोर्चा, दूध खरेदी दरकपातीचा निषेध 


सतेज पाटील-महादेव महाडिक गट भिडले, कार्यकर्त्यांची हाणामारी 


भाजपचा अध्यक्ष बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा खासदार ड्रायव्हिंग सीटवर! 


पवारसाहेब, खा. महाडिकांच्या भूमिकेबाबत गप्प का?


महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: MP Dhananjay Mahadik and MLC Satej Patil’s conflict over Gokul dudh sangh
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV