नागपूरच्या 12 वर्षांच्या चिमुरडीची 'गिनीज बुक'मध्ये नोंद

आजवर हा विक्रम नेपाळच्या 27 वर्षांच्या अर्पण शर्मांच्या नावावर होता. त्यांनी एका मिनिटात 43 वस्तू त्यांच्या क्रमांकांसह पाठ केल्या होत्या. मात्र अर्पण शर्मांच्या अर्ध्या वयाच्या गौरीने एका मिनिटात 50 वस्तू त्यांच्या क्रमांकांसह अचूक ओळखत विश्वविक्रम रचला आहे

नागपूरच्या 12 वर्षांच्या चिमुरडीची 'गिनीज बुक'मध्ये नोंद

नागपूर : काही जणांची स्मरणशक्ती चांगली असते, तर काहींना साध्या गोष्टीही आठवत नाहीत. नागपुरातल्या एका चिमुरडीची अफाट स्मरणशक्ती सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरली आहे. इतकंच नाही, तर 12 वर्षांच्या गौरी कोढे हिने नुकतंच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या तज्ज्ञांसमोर नवे विश्वविक्रम स्थापित केले आहेत.

गौरीने आजवर अनेक ट्रॉफीज, अनेक पुरस्कार आणि विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तिच्या अफाट
स्मरणशक्तीच्या जोरावर ती सामान्य नागरिकांसह मोठमोठ्या नेत्यांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. मात्र आता गौरीने तिच्या स्मरणशक्तीच्या जोरावर विश्वविक्रम नावावर केला आहे.

अवघ्या एका मिनिटाच्या कालावधीत जास्तीत जास्त वस्तू त्यांच्या अचूक क्रमांकांसह पाठ करण्याचा विक्रम... आजवर हा विक्रम नेपाळच्या 27 वर्षांच्या अर्पण शर्मांच्या नावावर होता. त्यांनी एका मिनिटात 43 वस्तू त्यांच्या क्रमांकांसह पाठ केल्या होत्या. मात्र अर्पण शर्मांच्या अर्ध्या वयाच्या गौरीने एका मिनिटात 50 वस्तू त्यांच्या क्रमांकांसह अचूक ओळखत विश्वविक्रम रचला आहे.

गौरीने घडवलेल्या विक्रमाची पद्धत :-

एका टेबलावर 1 ते 53 असे क्रमांक टाकून ठेवण्यात आले. उपस्थित प्रेक्षकांकडून कोणत्याही वस्तू घेऊन त्या 1 ते 53 क्रमांकावर ठेवण्यात आल्या. या वस्तू ठेवताना गौरीला ही प्रक्रिया पाहण्याची संधी दिली गेली नाही. सर्व वस्तू ठेऊन झाल्यानंतर गौरीला त्यांचं अवलोकन करण्यासाठी फक्त एक मिनिटांचा वेळ देण्यात आला.

त्यानंतर सर्व वस्तू उचलून एका टोपलीत ठेवण्यात आल्या आणि नंतर गौरीने सर्व वस्तू अचूकपणे त्यांच्या योग्य क्रमांकावर ठेवल्या.

आधीचे विक्रमवीर नेपाळच्या अर्पण शर्मा यांनी एका मिनिटात 43 वस्तू योग्य जागी ठेवल्या होत्या. मात्र महाराष्ट्रातील या चिमुकलीने अफाट स्मरणशक्तीच्या बळावर 50 वस्तू अचूकपणे योग्य ठिकाणी ठेवल्या.

लहानपणापासून हुशार असलेल्या गौरीने ही स्मरणशक्ती अथक प्रयत्नातून मिळवली आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून गौरीची आई वैशाली कोढे यांनी तिला विशेष तंत्र शिकवायला सुरुवात केली. गौरीच्या आई स्वामी विवेकानंद यांची पुस्तकं वाचायच्या. त्यांना स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्तेचं नेहमीच कौतुक वाटायचं. त्यांनी विवेकानंद यांच्या साहित्यावर संशोधन केलं आणि स्मरणशक्ती वाढवण्याचं तंत्र आत्मसात केलं.

इतकंच नाही, तर मायलेकीने मिळून त्यांची एक वेगळीच डायमंड पद्धत विकसित केली. त्याच डायमंड पद्धतीच्या
युक्त्या आणि सूत्रांचा वापर करुन वस्तू, शब्द, नावं, क्रमांक आणि भरपूर काही लक्षात ठेवता येतं. सोप्या शब्दात
सांगायचं तर व्हिज्युअलायझेशन आणि इमॅजिनेशनच्या माध्यमातून सर्व काही दीर्घकाळ स्मरणात ठेवता येतं, असं वैशाली कोढे यांचं तंत्र आहे.

गौरीला मोठेपणी आधी बिजनेसवुमन आणि त्यानंतर भारताची राष्ट्रपती व्हायचं आहे. ती आतापासूनच भारतीय
राज्यघटनेचा अभ्यास करत आहे. तिने या कोवळ्या वयात भारतीय राज्यघटनेचे बारकावे आत्मसात केले आहेत. तिला संपूर्ण घटना तोंडपाठ आहे.

लवकरच गौरीला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचं सर्टिफिकेट प्राप्त होईल आणि नागपूरकर कन्येच्या नावावर
जागतिक विक्रम कोरला जाईल.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV