6 दिवसात पासपोर्ट पडताळणी, नागपूर पोलीस राज्यात अव्वल

तंत्रज्ञान आणि त्वरित कारवाईच्या माध्यमातून नागपूर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

6 दिवसात पासपोर्ट पडताळणी, नागपूर पोलीस राज्यात अव्वल

नागपूर : पासपोर्ट काढण्याच्या नियमात परराष्ट्र मंत्रालयाने कितीही सुलभता आणली तरी सर्वाधिक वेळ हा पोलिसांकडून होणाऱ्या पासपोर्ट व्हेरिफिकेशनमध्ये जातो. मात्र नागपूर पोलिसांनी सर्वात कमी कालावधीत पासपोर्ट व्हेरिफिकेशन करणाऱ्या शहरांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. तंत्रज्ञान आणि त्वरित कारवाईच्या माध्यमातून नागपूर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

नागपूर पोलिसांनी पासपोर्ट व्हेरिफिकेशनचा कालावधी एक महिन्यावरून अवघ्या 6 दिवसांवर आणला आहे. त्यामुळे नेहमीच टीकेचे धनी ठरणाऱ्या नागपूर पोलिसांचं सध्या नागपूरकर कौतुक करताना दिसत आहेत.

नागपूरच्या शिवाजी नगरमध्ये राहणाऱ्या रमेश तोलानी यांना जुन्या पासपोर्टचं नूतनीकरण करायचं होतं. यासाठी त्यांनी पासपोर्ट कार्यालयात अर्ज केला. पासपोर्ट कार्यालयातून बाहेर पडल्याच्या तीन तासातच त्यांना नागपूर पोलिसांच्या अंबाझरी पोलीस स्टेशनमधून पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी फोन आला. अर्ज केल्याच्या तीन तासातच पोलीस पडताळणीसाठी येत आहेत हे कळल्यावर माजी शासकीय अधिकारी असलेले तोलानी काहीसे अचंबित झाले.

पासपोर्ट कार्यालयातर्फे पासपोर्ट जारी करण्यात येतो. मात्र त्यापूर्वी कागदोपत्री कारवाई करून पोलिसांकडून त्या व्यक्तीची पडताळणी करण्यात येते. व्यक्तीवर गुन्हे दाखल आहेत का, याची चौकशी करून पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र जारी करण्यात येतं. पोलिसांच्या विशेष शाखेतर्फे ही सर्व कामे करण्यात येतात.

यापूर्वी पासपोर्ट कार्यालयातून व्यक्तीचे टपाल संबंधित पोलीस स्टेशनमध्ये यायचे. मग पोलीस घराचा पत्ता शोधत त्या व्यक्तीच्या घरी जायचे. पडताळणी करून मग पुन्हा टपालाने कागदपत्र पासपोर्ट कार्यालयाला पाठवली जायची. या संपूर्ण कामासाठी यापूर्वी किमान एक महिन्याचा कालावधी लागायचा. सध्या नागपुरात पासपोर्टसाठी दर महिन्याला सुमारे 3 हजार 100 अर्ज येतात.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या सूचनेचं पालन करत नागपूर पोलिसांनी कात टाकली आहे. अत्याधुनिक कार्यप्रणाली निवडत ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून पडताळणीसाठी पूर्वी लागणारा एक महिन्याचा कालावधी आता केवळ 6 दिवसांवर आणलाय. पासपोर्ट पडताळणीसंदर्भात अधिकारी आणि कर्मचारी आता टॅबचा वापर करत असून गुन्हे तपासण्यासाठी पोलिसांच्या सीसीटीएनएस प्रणालीचा वापर करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेचं पोलीस आयुक्तही कौतुक करत आहेत.

पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी इतर शहरात लागणारा कालावधी

  • औरंगाबाद शहर - 42 दिवस

  • मुंबई शहर - 30 दिवस

  • नाशिक शहर - 28 दिवस

  • पुणे शहर - 23 दिवस

  • कोल्हापूर - 15 दिवस


केंद्र सरकारच्या परराष्ट्र विभागानेही नागपूर पोलिसांच्या या त्वरित सेवेचं कौतुक केलं आहे. भविष्यात नागपूर पोलिसांनी पासपोर्ट पडताळणीचं काम 3 दिवसात पूर्ण करण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. त्यामुळे नागपूरच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे नेहमीच टीकेचे धनी ठरणारे नागपूर पोलीस किमान या बाबतीत तरी राज्यात आणि देशात कौतुकास पात्र ठरले आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nagpur police top in fast passport verification process
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV