राज्यसभेवर भाजपकडून जावडेकर-राणेंसोबत एकनाथ खडसे?

महाराष्ट्राच्या राजकारणातून एकनाथ खडसेंना दिल्लीत पाठवण्याच्या हालचाली सुरु आहेत. तर नारायण राणे यांनी राज्यसभेची ऑफर स्वीकारली आहे.

राज्यसभेवर भाजपकडून जावडेकर-राणेंसोबत एकनाथ खडसे?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून एकनाथ खडसेंना दिल्लीत पाठवण्याच्या हालचाली सुरु आहेत. राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातून प्रकाश जावडेकर आणि नारायण राणे यांच्यासोबत खडसेंचं नाव जोडलं जाण्याची शक्यता आहे. राणेंनी राज्यसभेची ऑफर स्वीकारली असून खडसेंचं नाव निश्चित होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.

राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. त्यातील 6 जागा महाराष्ट्रातून आहेत. विधानसभेचे संख्याबळ पाहता, तीन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जातो. त्यामुळे या तीन जागांवर महाराष्ट्रातून भाजप कुणाला राज्यसभेवर पाठवतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.

प्रकाश जावडेकर हे विद्यमान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असून, ते सध्या मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेले आहेत. त्यामुळे आता ते होम ग्राऊंडवरुन म्हणजे महाराष्ट्रातून राज्यसभेत जातील.

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करुन एनडीएत सहभाग घेतला. मात्र राज्यातील मंत्रिपदाच्या आशेवर असणाऱे राणे आता राज्यसभेच्या दिशेने कूच करताना दिसत आहेत. राज्यसभेची ऑफर राणेंनी विचार करुन स्वीकारल्याची माहिती आहे.

एकनाथ खडसे आरोपांच्या जंजाळात अडकल्यापासून मंत्रिमंडळापासून दूर आहेत. त्यामुळे भाजपच्या या ज्येष्ठ नेत्याचं एकप्रकारे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न पक्षाकडून होताना दिसत आहे.

16 राज्यातील एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 10, तर महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे.

23 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार

वंदना हेमंत चव्हाण  - राष्ट्रवादी

डी. पी. त्रिपाठी  - राष्ट्रवादी

रजनी पाटील  - काँग्रेस

अनिल देसाई  - शिवसेना

राजीव शुक्ला - काँग्रेस

अजयकुमार संचेती - भाजप

केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांचा कार्यकाळ संपणार आहे. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, राजीव शुक्‍ला, रेणुका चौधरी यांच्यासह अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत.

कोणत्या पक्षाचे किती खासदार निवृत्त?

भाजप -17

काँग्रेस - 12

समाजवादी पक्ष - 6

जदयू - 3

तृणमूल कॉंग्रेस - 3

तेलुगू देसम पक्ष - 2

राष्ट्रवादी कॉंग्रेस - 2

बीजद - 2

बसप - 1

शिवसेना - 1

माकप - 1

अपक्ष  - 1

राष्ट्रपती नियुक्‍त - 3

संख्याबळानुसार आता महाराष्ट्रात राज्यसभेवर सहापैकी भाजपचे 3 उमेदवार, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

कोणत्या राज्यातील किती जागा?

आंध्र प्रदेश - 3

बिहार - 6

छत्तीसगड - 1

गुजरात - 4

हरियाणा - 1

हिमाचल प्रदेश - 1

कर्नाटक - 4

मध्य प्रदेश - 5

महाराष्ट्र - 6

तेलंगणा - 3

उत्तर प्रदेश - 10

उत्तराखंड - 1

पश्चिम बंगाल - 5

ओदिशा - 3

राजस्थान - 3

झारखंड - 2

याशिवाय केरळातील खासदार वीरेश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे त्या जागेसाठीही पोटनिवडणूक होईल. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचं राज्यसभेत सर्वाधिक संख्याबळ आहे.

संबंधित बातम्या


राज्यसभेसाठी भाजपची महाराष्ट्रातून राणेंसह 3 नावं निश्चित : सूत्र


राज्यसभेच्या 58 जागांसाठी 23 मार्चला निवडणूक


राज्यसभा निवडणूक : शिवसेनेकडून अनिल देसाईंना पुन्हा संधी


जया बच्चन पुन्हा समाजवादी पक्षाकडून राज्यसभा उमेदवार


जया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी?

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Narayan Rane and Eknath Khadse likely to go on Rajyasabha from Maharashtra by BJP latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV