गेल्या तीन महिन्यांपासून परभणी महापालिकेचे कर्मचारी पगाराविना

येणाऱ्या 6 तारखेपासून सफाई कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून परभणी महापालिकेचे कर्मचारी पगाराविना

परभणी : स्थापनेपासूनच डबघाईला आलेल्या परभणी महानगरपालिकेचा कारभार आणखी ढासळला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पगाराविना कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. शासनाने सहायय्क अनुदान बंद केल्याने यावर आणखी कुऱ्हाड पडली असून येणाऱ्या 6 तारखेपासून सफाई कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे.

2011 साली स्थापन झालेल्या परभणी महानगरपालिकेला निधी अभावी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. परभणी महापालिकेच्या स्थापनेपासून कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पाच वर्ष सरकारकडून सहाय्यक अनुदान दिलं जात होतं. त्यानंतर महापालिकेने आपलं उत्पन्न वाढवून कर्मचाऱ्यांचे पगार भागवणं आवश्यक होतं. पण महापालिकेच्या उत्पन्नात विशेष वाढ न झाल्याने आता पगारासाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत.

याचा परिणाम महापालिकेच्या सर्वच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हे कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत काम करत आहेत. पण प्रशासन यावर कोणतंही ठोस पाऊल उचलत नसल्याने अद्यापही कोणताच तोडगा निघू शकला नाही. यामुळे येणाऱ्या 6 तारखेपासून सफाई कर्मचारी संपावर जाणार असून त्यानंतर टप्याटप्याने इतर कर्मचारी यात सहभागी होणार आहेत.

महापालिका झाल्यानंतर उत्पन्न वाढवण्याच्या स्रोतांमध्ये वाढ झाली नाही. त्यानंतर स्थानिक करही बंद झाला. याचा एकूण परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर झाला असून अडचणीत आणखी वाढ झाली. या आर्थिक अडचणीमुळे शहरवासियांना येणाऱ्या काळात अनंत अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. यामुळे प्रशासन आणि सरकार यांनी मिळून यावर त्वरित पाऊल उचलणं गरजेचं आहे. अन्यथा नागरिकांच्या समस्या वाढतील, त्यात महापालिका शहराचा काहीही विकास तर करु शकणार नाहीच, शिवाय कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Parbhani municipal corporation not paying salary to employees from last three months
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV