मोपलवार प्रकरण,अमरावतीचे पोलिस उपअधीक्षक चौकशीच्या फेऱ्यात

प्रवीण पाटील हे अमरावतीचे पोलीस उपअधीक्षक आहेत. त्यामुळे या प्रकरणातील पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.

मोपलवार प्रकरण,अमरावतीचे पोलिस उपअधीक्षक चौकशीच्या फेऱ्यात

मुंबई : आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या कथित ऑडिओ प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक प्रवीण पाटील चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

आरोपी सतिश मांगलेच्या चौकशीतून धक्कादायक बाब पुढे आली आहे. पोलीस उपअधीक्षक प्रवीण पाटील यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. पाटील हे अमरावतीचे पोलीस उपअधीक्षक आहेत. त्यामुळे या प्रकरणातील पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.

या प्रकरणी आम्ही पोलीस उपअधीक्षक प्रवीण पाटील यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.

वरिष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करण्यात आला. ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड केल्याची शक्यता या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आल्याची माहिती आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प मोपलवारांच्या ऑडिओ क्लिपमुळे आणखी वादात अडकलं. या प्रकल्पाचे तत्कालीन प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे वादग्रस्त फोन संभाषणं समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले.

ज्या समृद्धी महामार्गावरून सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये रण सुरु आहे, त्याच महामार्गाची त्यावेळी जबाबदारी असणाऱ्या मोपलवार यांच्यावर गंभीर आरोप झाले. धक्कादायक म्हणजे हे आरोप सेटलमेंटचे होते. शेतकऱ्यांच्या मते या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्थ यांच्यात एका इमारतीच्या बांधकामावरून सेटलमेंट सुरु आहे.

‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?
मोपलवार – जाल मेहता नाव सांगितलं ना तुम्ही?

मध्यस्थी – हो.. जाल मेहता.

मोपलवार – त्याला सांगा आपण त्याला 15 हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट देतोय.

मध्यस्थी – कुठे?

मोपलवार – अरे तो बोरीवलीचा.. त्याला मंत्रालयात काही द्यावे लागतील.. आपल्याकडे..त्याला कोट करा 1 कोटी रुपये..

मध्यस्थी – अच्छा

मोपलवार – त्याला आपण दिलेल्या प्लॉटमुळे हजार स्क्वेअर फुटचे 50 फ्लॅट विकायला मिळतील… मंत्रालयात 1 – 2 दिले तर ती जमीन मिळून जाईल.

मध्यस्थी – म्हणजे टोटल मंत्रालय पकडून त्याला 4 करोडचा खर्च आहे..

मोपलवार – एक दोन पकडून काय असेल ते असेल… आपल्याकडे एकच्या खाली घेणार नाही.. नाहीतर सोडून द्या विषय. कुठल्याच फ्रेममध्ये बसत नाही ते

मध्यस्थी – नियमबाह्य आहे म्हणून एवढं करावंच लागेल

मोपलवार – 1500 मीटर, त्यात स्लम असल्यामुळे 2.5 चा एफएसआय मिळेल. एकूण त्याला 50 हजार स्क्वेअर फिटचे फ्लॅट सेल करायला मिळतील. 10 हजार पर स्क्वेअर फिट जरी म्हटलं तरी 50 कोटी रुपयांचे फ्लॅट होतील. त्यात 30 – 40 कोटी खर्च म्हटला तरी 10 कोटी त्याचा फायदा आहे.

मध्यस्थी – त्याला वाढवून सांगू की आहे तसच?

मोपलवार – सांगा तुम्ही… आधी काय म्हणतोय बघू..

मोपलवार – अशोक सखाराम उबाळे या हिरोचा फोन आला..त्याला नाही म्हणून सांग..

मध्यस्थी – काय म्हणून?

मोपलवार – कुठल्या तरी मंडल अधिकाऱ्याची वसई जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात बदली करायला. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात बदली जमत नाही… नाही म्हणून सांग त्याला..बाकी त्याला सांगून टाक.

या संभाषणात मोपलवार आहेत की नाहीत, याची पुष्टी आम्ही करत नाही. पण समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत होती.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Radheshyam Mopalwar case, inquiry of Amravati Police Deputy Superintendent Pravin Patil latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV