पालख्या नाचवत, गाऱ्हाणं घालत कोकणात शिमगोत्सवाचा जल्लोष

विधिवत पूजन करत देव पालख्यात विराजमान होतात. गावाचा गुरव उत्सव सुरळीत पार पडावा म्हणून पाहिलं गाऱ्हाणं घालतो आणि इथूनच शिमगोत्सवाला प्रारंभ होतो.

पालख्या नाचवत, गाऱ्हाणं घालत कोकणात शिमगोत्सवाचा जल्लोष

रत्नागिरी : शिमगोत्सव म्हणजे कोकणातील सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचं दर्शन घडवणारा सण. कोकणात मात्र शिमगोत्सवाला सहा दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. कोकणातील ग्रामदेवतांच्या पालख्या देवळाबाहेर पडल्या आहेत. गावात दाखल झालेल्या चाकामान्यांसह कोकणी माणूस आपल्या ग्रामदेवतांच्या या पालख्या डोक्यावर घेऊन नाचत शिमगोत्सवात सहभागी झाला आहे.

कोकणात फाक पंचमीच्या दिवशीच शिमगोत्सवाला प्रारंभ होतो. शिमगोत्सवाच्या चाहुलीनेच कोकणच्या गावागावातील ग्रामदेवतांचे मंदिर सजू लागतात. गावाचे गावकर आणि मानकरी ग्रामदेवतेच्या मंदिरात जमतात आणि सुरु होतो देवांना पालखीत विराजमान करण्याचा सोहळा. कोकणात याला पालखीला रुप लावण्याचा सोहळा म्हटलं जातं. वर्षातून ठराविक दिवशीच देव पालखीत विराजमान होतात . त्यांना पालखीत कोणी बसवायचं-त्याचं पूजन कोणी करायचं याचे मान निश्चित असतात.

देवाच्या आकर्षक मूर्ती वस्त्रालंकारांसह विराजमान केल्या जातात. विधिवत पूजन करत देव पालख्यात विराजमान होतात. गावाचा गुरव उत्सव सुरळीत पार पडावा म्हणून पाहिलं गाऱ्हाणं घालतो आणि इथूनच शिमगोत्सवाला प्रारंभ होतो.गावच्या मुख्य होळीच्या आधी अनेक गावात ग्रामस्थ जंगलात जाऊन छोट्या छोट्या होळ्या आणतात. शेवरीच्या झाडाच्या या होळ्या फाकपंचमीच्या दिवशी ग्रामस्थ जंगलातून होळी म्हणून तोडून आणतात. ढोलताशांच्या गजरातच ही होळी वाजत गाजत आणली जाते. रात्री उशिरा गावातील ग्रामस्थ नाचवतच ही होळी गावात घेऊन येतात. या होळीला मग निशाण-मानाचे नारळ लावले जातात हार-तुरे घालून  होळी सजवली जाते. मग वर्षानुवर्षांच्या ठरलेल्या जागी होळी उभी केली जाते. मानकरी होळीची पूजा करतात आणि याच होळीभोवती होम पेटवला जातो.

याच कोकणच्या शिमगोत्सवाचं वैशिष्ट्यं म्हणजे या शिमगोत्सवातच देव पालख्यात बसून कोकणी माणसाच्या घराघरात येतात. दारात आलेल्या पालख्यांचे जल्लोषात स्वागत होतं. वर्षानुवर्षे ठरलेल्या क्रमाने आणि दिवसाप्रमाणेच या पालख्या घर घेतात या मानपानात कोणताच बदल होत नाही. कोकणी माणूस वर्षभर कितीही लांब असला तरी ज्या दिवशी देव घरी येतो त्या दिवशी तो आपल्या कोकणातील घरी परततो.दरम्यान या काळात प्रत्येक गावाच्या ग्रामदेवतांच्या पालख्या मंदिराबाहेर पडतात. या काळात कोकणातील कोणत्याही गावात गेलात तर आपल्या ग्रामदेवतेची पालखी डोक्यावर घेऊन नाचणारा कोकणी माणूस आपल्या पाहायला मिळतो. आपल्या गावाचं ग्रामदैवत म्हणजे कोकणी माणसाचं सर्वोच्च श्रद्धास्थान. कोकणच्या पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात कधी खांद्यावर, कधी एकावर एक चढत तर कधी एकट्याने अख्खी पालखी डोक्यावर घेत देह-भान विसरुन नाचणारा कोकणी माणूस आपल्याला पाहायला मिळतो.

या दहा दिवसात कोकणी माणूस गावात दाखल झालेल्या चाकरमान्यांसह आपले परंपरागत मान आणि चालीरीती जपत हा उत्सव जल्लोषात साजरा करतो.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ratnagiri : Shimgotsav/Holi celebration in Konkan
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV