थकीत वीज बिलावर पर्याय, सौर ऊर्जा निर्मितीतून शाळा प्रकाशमय

औरंगाबादेतील 4 शाळांनी याला पर्याय म्हणून स्वतःची वीज निर्मिती करून पुन्हा शाळा डिजिटल केल्या आहेत.

थकीत वीज बिलावर पर्याय, सौर ऊर्जा निर्मितीतून शाळा प्रकाशमय

औरंगाबाद : राज्यात वीज बील थकीत असल्यामुळे 12 ते 13 हजार सरकारी शाळांची वीज तोडली आहे. त्यामुळे नुकत्याच डिजिटल झालेल्या शाळांचे संगणक कक्ष बंद पडलेत. प्रोजेक्टर, संगणक कक्षाला टाळे लागले आहेत. पण औरंगाबादेतील 4 शाळांनी याला पर्याय म्हणून स्वतःची वीज निर्मिती करून पुन्हा शाळा डिजिटल केल्या आहेत.

कधीकाळी औरंगाबाद जिल्ह्यातल्या शाळेत अंधारातच विद्यार्थ्यांना उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे धडे शिकवले जात होते. शाळेत संगणक होतं, पण त्यावर धूळ चढलेली, टीव्हीवरही धुळीचा थर, प्रोजेक्टर असूनही अडचण आणि नसून खोळंबा होता, असलेले बल्ब गेल्या कित्येक महिन्यांपासून शोभेची वस्तू झाले होते. कारण थकीत बिलामुळे महावितरणने शाळेचं वीज कनेक्शन तोडलं होतं.

शाळेने या सर्व परिस्थितीवर मात केली आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करत शाळेने बिलापासून कायमची सुटका मिळवली आहे. शाळेतील शिक्षकांच्या पुढाकाराने ही किमया साधता आली आहे.

सौर उर्जेचा युनिट उभारण्यासाठी पैशांची गरज होती. प्रत्येक शाळेला 42 हजार रुपयांची गरज होती. पैसा उभा करणं मोठं आव्हान होतं. मात्र सुदैवाने गावामध्ये ग्रामपरिवर्तन आलं होतं. त्यांना निधी मागायचं ठरवलं. त्यांनीही ग्राम सामाजिक परिवर्तन मिशनमधून निधी दिला आणि पैठण तालुक्यातील जांभळी, जांभळीवाडी, चिंचोली आणि जांभळी तांडा या शाळा प्रकाशमय झाल्या.

शाळांनी केलेला प्रयोग हा राज्याच्या शिक्षण विभागाला चांगलीच चपराक आहे. एकीकडे शाळा डिजिटल केल्याच्या घोषणा केल्या जातात. मात्र दुसरीकडे विद्युत पुरवठा नसल्यामुळे या शाळा असून नसल्यासारख्या आहेत. या 4 शाळांचा आदर्श महाराष्ट्रातील 13 हजार शाळांनी घेतला तर वीज बिलासाठी कोणासमोर हात जोडण्याची वेळ येणार नाही.

बातमीचा व्हिडीओ :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: schools generate light from sour panels in Aurangabad district
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV