चंद्राबाबूंशी गुफ्तगू नाही, शिवसेनेनं फोनचर्चेचं वृत्त फेटाळलं

एनडीएतील इतर काही नेत्यांनी ‘मातोश्री’चा फोन फिरवला, हे लवकरच आम्हाला वृत्तपत्रांतून कळेल असं म्हणत उद्धव ठाकरे बरसले.

चंद्राबाबूंशी गुफ्तगू नाही, शिवसेनेनं फोनचर्चेचं वृत्त फेटाळलं

मुंबई : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे सर्वसर्वा चंद्राबाबू नायडू यांच्याशी फोनवरुन चर्चा झाल्याचं वृत्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावलं आहे. 'सामना' या मुखपत्रातून उद्धव यांनी माध्यमांवर ताशेरे ओढले आहेत.

एनडीएतील इतर काही नेत्यांनी ‘मातोश्री’चा फोन फिरवला, हे लवकरच आम्हाला वृत्तपत्रांतून कळेल असं म्हणत उद्धव ठाकरे बरसले. उद्धव ठाकरे आणि चंद्राबाबू नायडू यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची बातमी 'टाईम्स ऑफ इंडिया' या वर्तमानपत्राने दिली होती.

'सामना'तून उद्धव काय म्हणाले?

सध्या जुन्या मित्रांना हाडवैरी ठरवून जी सत्तालोलुपता दाखवली जात आहे ती उबग आणणारी आहे. आम्हीच ही ‘उबग’ स्पष्टपणे समोर आणली, पण आता चंद्राबाबूंनीही ती खदखद बाहेर काढली. चंद्राबाबूंना आमच्या शुभेच्छा आहेत, पण त्यांच्या राजकीय मसलती त्यांनीच कराव्यात. महाराष्ट्रात ममता बॅनर्जी मध्यंतरी येऊन गेल्या. त्यांनाही सदिच्छा म्हणून भेटलो. आम्ही त्यांना भेटलो यावरही अनेकांनी तर्ककुतर्कांची फवारणी केली. आता चंद्राबाबूंच्या बाबतीत तेच सुरू आहे. एनडीएतील इतर काही नेत्यांनी ‘मातोश्री’चा फोन फिरवलाय हे लवकरच आम्हाला वृत्तपत्रांतून कळेल अशी आशा आम्ही बाळगत आहोत.

चंद्राबाबूंचा उद्धव ठाकरेंना फोन, एनडीए सोडण्यावर चर्चा?


शिवसेना आणि तेलगू देसम पक्षाच्या विचारधारेत जमीन-आस्मानाचं अंतर असल्याचंही उद्धव म्हणाले.

तेलगू देसम पक्षाचं शिष्टमंडळ नवी दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेणार आहे. आंध्र प्रदेशच्या विकासासाठी तसंच अमरावती या नव्या राजधानीसाठी कुठलीही तरतूद केंद्रानं न केल्यामुळे चंद्राबाबू नाराज आहेत.

टीडीपी आणि चंद्राबाबूंचं महत्त्व

चंद्राबाबू नायडू हे तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वात एनडीएच्या स्थापनेपासून टीडीपी एनडीएत आहे. 2014 साली त्यांनी भाजपसोबत निवडणूक लढवत विभाजीत आंध्र प्रदेशमध्ये एकहाती सत्ता मिळवली. ते 1994 ते 2004 असं सलग दहा वर्षे संयुक्त आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर 2004 ते 2014 या काळात त्यांच्याकडे आंध्र प्रदेश विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी होती. 2014 साली सत्ता मिळवत ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

टीडीपी हा दक्षिण भारतातील महत्त्वाचा पक्ष आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत सध्या 175 पैकी 125 जागा टीडीपीकडे आहेत, तर भाजपच्या केवळ 4 जागा आहेत. विरोधी पक्षात असलेल्या वायएसआर काँग्रेसच्या 46 जागा आहेत. टीडीपीची एकहाती सत्ता असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये भाजपसाठी चंद्राबाबूंची नाराजी हा मोठा धक्का आहे. कारण, 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशच्या 25 लोकसभेच्या जागांपैकी 17 जागांवर टीडीपीने विजय मिळवला होता.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shivsena denies the so called conversation with Chandrababu Naidu latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV