नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

श्रीपाद छिंदम यांना भाजपने पक्षातून बडतर्फ केली असून, छिंदम यांची उपमहापौर पदावरुनही हकालपट्टी करण्यात आली आहे.

नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

अहमदनगर : अहमदनगरमध्ये भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. छिंदम यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. या क्लिपमुळे सध्या अहमदनगर शहरात तणाव निर्माण झाला आहे.

भाजपचे नेते असलेले श्रीपाद छिंदम हे अहमदनगरचे उपमहापौर आहेत. या कथित क्लिपमध्ये एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना छिंदम यांनी फोन केला, यावेळी बोलताना उपमहापौरांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप अशोक बिडवे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी कामगार युनियनकडे तक्रारही दाखल केली आहे.

दरम्यान, या क्लिपनंतर शहरात तणाव निर्माण झाला आहे. श्रीकांत छिंदम यांच्याविरोधात राष्ट्रावादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला, तर शिवसेनेनंही छिंदम यांचा पुतळा जाळून निषेध केला आहे. या क्लिपमुळे शिवसेना आणि भाजपमधला अंतर्गत तणाव पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

छिंदम यांच्यावर भाजपची कारवाई

“शिवजयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या अक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करतो. छिंदम यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. छिंदम यांची उपमहापौर पदावरुनही हकालपट्टी करण्यात आली आहे.” अशी माहिती भाजपचे नेते आणि अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांनी दिली.

श्रीपाद छिंदम नेमकं काय म्हणाले?

अशोक बिडवे – हॅलो साहेब...

श्रीपाद छिंदम – बिडवे, काल माणसं आले नाही बरं का...

अशोक बिडवे – काल किन्नर साहेब बोलले ना तुम्हाला, मी पण त्यांना बोललो होतो.

श्रीपाद छिंदम – पाठवणार आहे, का नाही तेवढं सांग फक्त. बाकी कोणाचं नाव नको सांगू.

अशोक बिडवे – बरं.. बरं.. पाठवतो. हे शिवजयंती होऊ द्या ना साहेब...

श्रीपाद छिंदम – ते गेलं ##$%@##... तू काय शिवाजीच्या ##$%@##?

अशोक बिडवे – अहो साहेब... सकाळी सकाळी चांगलं बोला...

श्रीपाद छिंदम – मग...

अशोक बिडवे – असं बोलतात काय सर.. तुम्हाला बोलतोय ना की माणसं नाहीयेत,  शिवजयंती होऊ द्या...

श्रीपाद छिंदम – माझं घरचं काम आहे ते...

अशोक बिडवे – मग तुम्ही नीट बोला ना राव...

श्रीपाद छिंदम – मग एक काम कर ना... शिवजयंतीचा इतका पुळका आहे, तर एक-दोन माणसं वाढून घे ना पालिकेतून...

अशोक बिडवे – माणसं नाहीत म्हणून... पण तुमचं काम केलं नाही का कधी?

श्रीपाद छिंदम – माणसं पाठव, बाकीचं नको सांगू तू....

बातमीचा व्हिडीओ :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shripad Chhindam’s objectionable statement about Shivaji Maharaj
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV