एसटीचा दिवसभर 'थांबा', प्रवाशांचा खोळंबा!

सायंकाळी 5 वाजेपर्यंत कामावर परतण्याचं सरकारचं आवाहन कर्मचारी संघटनेनं धुडकावलं आहे.

By: | Last Updated: 17 Oct 2017 07:41 PM
एसटीचा दिवसभर 'थांबा', प्रवाशांचा खोळंबा!

मुंबई : अवघ्या महाराष्ट्रात सुरु असलेला दिवाळीच्या उत्साहावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने पाणी पडलं आहे. कारण मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या संपाला 19 तास उलटले आहेत. पण अजूनही सर्वसामान्यांची एसटी मात्र चक्काजाम करुन बसली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना सायंकाळी 5 वाजेपर्यंत कामावर परतण्याचं सरकारचं आवाहन कर्मचारी संघटनेनं धुडकावलं आहे. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तातडीने करा, यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेने राज्यव्यापी संप पुकारला आहे.

ऐन दिवाळीमध्ये एसटी ठप्प झाल्याने दिवाळीसाठी घरी परतणाऱ्या लोकांना आज पहाटेपासूनच मनस्तापाला सामोरं जावं लागलं. राज्यभरातले डेपो बंद आहेत. त्यामुळे दिवाळीत प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.

सातवा वेतन आयोग शक्य नाही : दिवाकर रावते

पुढची 25 वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे पैसाच नाही, असं म्हणत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी धुडकावून लावली आहे.

शिवाय एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असून त्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोपही रावतेंनी केला आहे.

दिवाकर रावते म्हणाले की, कर्मचाऱ्यांचा संप कामगार न्यायालयाने, औद्योगिक न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. तरीही सातव्या वेतन आयोगासाठी त्यांनी संप पुकारला आहे. सातवा वेतन आयोग देण्याची शक्ती महामंडळाची आणखी 25 वर्ष तरी होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. कारण एसटी कायम तोट्यात असते. त्यापलिकडे जाऊन सरकारने सातवा वेतन आयोग द्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि बैठक बोलावली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मी सातवा वेतन आयोग देऊ शकत नाही, तुम्हालाही देऊ शकत नाही. शिवाय दिवाळीच्या काळात संप पुकारुन लोकांना वेठीला धरु नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.”

छाजेड यांच्यामागे संघटना धावतेय

तरीही कर्मचाऱ्यांची संघटना छाजेड नावाच्या काँग्रेसमधील व्यक्तीमागे धावतेय. त्यांचं ऐकून संघटना काम करते. छाजेड हे काँग्रेसचे आहेत, त्यांना ह्या सरकाला अपशकून करायचं आहे. त्यांच्या नादाला लागून ही मंडळी संप करतेय, अशी माझी भावना बनली आहे.

एकीकडे राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि इतर वर्गाचं लांगूलचालन सुरु असताना अहोरात्र प्रवाशांच्या सेवेसाठी झटणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांबाबत मंत्र्यांनी असंवेदनशील विधान का करावं असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाटाघाटीसाठी आमचे दरवाजे उघडे : जयप्रकाश छाजेड

दिवाकर रावतेंचं विधान उद्विग्नतेतून आणि विनोदातून आलं आहे, अशी प्रतिक्रिया इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिली आहे. “लोकांचे आज जे हाल होत आहेत, त्याची संपूर्ण जबाबदारी दिवाकर रावते आणि राज्य सरकारची आहे. आम्ही हौसेने संप केलेला नाही, वाटाघाटीसाठी आमचे दरवाजे उघडे आहेत,” असंही छाजेड म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 3 मागण्या :

  • एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा

  • पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी

  • जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: ST strike एसटी संप
First Published:
LiveTV