'चिअर्स' महाग! महाराष्ट्रात आजपासून बिअरची दरवाढ

राज्य सरकारने माईल्ड बिअरवर 25 टक्क्यांनी, तर स्ट्राँग बिअरवर 35 टक्क्यांनी जकात कर वाढवला आहे.

'चिअर्स' महाग! महाराष्ट्रात आजपासून बिअरची दरवाढ

मुंबई : बिअर पिऊन चिल आऊट करणाऱ्या मद्यप्रेमींच्या खिशाला आता आणखी चाट पडणार आहे. एक्साईज कर 25 ते 35 टक्के वाढवल्यामुळे महाराष्ट्रात बिअरचे दर वाढणार आहेत.

माईल्ड बिअरचा पिंट (330 मिली) पिण्यासाठी 3 रुपये, तर स्ट्राँग बिअर पिण्यासाठी साडेचार रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. माईल्ड बिअरची पूर्ण बॉटल (650 मिली) रिचवण्यासाठी 5 रुपये, तर स्ट्राँग बिअरच्या पूर्ण बॉटलसाठी साडेसहा रुपयांची दरवाढ होणार आहे.

राज्य सरकारने माईल्ड बिअरवर 25 टक्क्यांनी, तर स्ट्राँग बिअरवर 35 टक्क्यांनी जकात कर वाढवला आहे. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर एक्साईज ड्युटी मोजली जाते. विक्रीची किंमत किंवा एमआरपी ही व्हॅट (35 टक्के) आकारल्यानंतर ठरते. त्यामुळे प्रत्येक ब्रँडची नवीन किंमत येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

किंगफिशर, कार्ल्सबर्ग, बडवाईजर यासारख्या ब्रँड्सच्या पिंटची किंमत 60 ते 100 रुपयांच्या घरात आहे, तर एका बॉटलसाठी सध्या 110 ते 230 रुपयांच्या दरम्यान रक्कम मोजावी लागते.

आधीचा फॉर्म्युला

माईल्ड बिअरवर एक्साईज ड्युटीसाठी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर 150 टक्के किंवा प्रतिलीटर 33 रुपये यापैकी जे जास्त असेल, ती रक्कम आकारली जात होती. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर 175 टक्के किंवा प्रतिलीटर 42 रुपये यापैकी जे जास्त असेल, ती रक्कम आकारण्याचा फॉर्म्युला तयार करण्यात आला.

स्ट्राँग बिअरवर एक्साईज ड्युटीसाठी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर 200 टक्के किंवा प्रतिलीटर 60 रुपये यापैकी जे जास्त असेल, ती रक्कम आकारली जात होती. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर 235 टक्के किंवा प्रतिलीटर 80 रुपये यापैकी जे जास्त असेल, ती रक्कम आकारण्यात येईल.

महाराष्ट्रात वर्षाला 33 कोटी लिटर बिअरची विक्री होते. त्यामुळे जकात कर वाढवल्यामुळे वार्षिक महसूल 150 कोटी रुपयांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील वाईन इंडस्ट्रीला चालना देण्यासाठी वाईनवर एक्साईज आकारला जात नाही. नाशकातील वाईन ब्रँड्सना प्रमोट करण्याचा सरकारचा हेतू आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV