माळशेज घाटात देशातला पहिला पारदर्शक वॉक-वे

वॉक वे वरुन चालताना पर्यटकांना हवेत चालण्याचं थ्रिल अनुभवता येईल, तसंच खोल दरीचा नयनरम्य नजारा पाहता येईल.

माळशेज घाटात देशातला पहिला पारदर्शक वॉक-वे

ठाणे : माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्याची भुरळ फक्त महाराष्ट्रच नाही, तर देशभरातील पर्यटकांना पडली आहे. माळशेजचं हे सौंदर्य आता जगाच्या नकाशावर आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. लवकरच माळशेज घाटात देशातला पहिला पारदर्शक पूल (वॉक वे) बांधण्यात येणार आहे.

माळशेज घाटातील 700 मीटर खोल दरीवर 18 मीटर लांबीचा पारदर्शक वॉक-वे बांधण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हा प्रशासनाने मांडला आहे. प्रस्ताव आणि बजेटला मंजुरी मिळाल्यास येत्या तीन वर्षांत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल. तसं झाल्यास हा देशातील पहिला पारदर्शक पूल ठरेल.

कल्याण-अहमदनगर हायवेवर माळशेजमध्ये एमआरटीडीसीचं रिसॉर्ट आहे. त्याच्या जवळच माळशेजच्या दरीलगत दुमजली इमारत बांधण्यात येणार असून त्यावर हा पारदर्शी वॉक वे असेल. 18 मीटर लांबीचा यू-शेप वॉक वे बांधण्याची प्रशासनाची योजना आहे. वॉक वेचं फ्लोरिंग पारदर्शी (काचेचं) असेल.

या वॉक वे वरुन चालताना पर्यटकांना हवेत चालण्याचं थ्रिल अनुभवता येईल. खोल दरीचा नयनरम्य नजारा पाहता येईल आणि अर्थात डेकवर (काळजी घेऊन) फोटो काढण्याचीही मुभा असेल.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन टप्प्यात ही योजना प्रत्यक्षात आणायची आहे. पहिल्या टप्प्यात वॉक वेचं बांधकाम, तर दुसऱ्या टप्प्यात आर्ट गॅलरी, अॅम्पिथिएटर, म्युझिकल फाऊण्टन्स याची रचना करायची आहे. आमदार किसन कथोरे यांनी हा प्रस्ताव मांडला असून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे.

माळशेज घाट पावसाळ्यात पर्यटकांनी फुललेला असतोच, मात्र वॉक वे बांधल्यावर वर्षाचे 365 दिवस इथे पर्यटकांची गर्दी होईल. जिल्ह्याच्या महसूलात वाढही होईल आणि जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळही विकसित होईल, असं दुहेरी उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Thane : Malshej Ghat to get transparent skywalk, first walkway in country latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV