सत्ता असो वा नसो, शेवटपर्यंत तुमच्यासाठी जगेन : उदयनराजे

‘सत्ता असो वा नसो त्याला फार किंमत देत नाही. पण मात्र, जोपर्यंत ताकद आहे. तोवर तुमच्या सगळ्यांसाठी लढणार.'

सत्ता असो वा नसो, शेवटपर्यंत तुमच्यासाठी जगेन : उदयनराजे

सातारा : ‘सत्ता असो वा नसो त्याला फार किंमत देत नाही. पण मात्र, जोपर्यंत ताकद आहे. तोवर तुमच्या सगळ्यांसाठी लढणार.’ असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थितांची मनं जिंकली. उदयनराजेंच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावली होती.

उदयनराजेंची तुफान फटकेबाजी :

‘सर्वप्रथम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. मला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या शरद पवार आणि तुम्हा सर्वच लोकांचे आभार मानतो. जेव्हा सर्व मान्यवर त्यांचे मनोगत व्यक्त करत होते, तेव्हा मी इकडे-तिकडे आवर्जून पाहत होतो की, इथं कोणी हरभऱ्याचं झाड लावलं आहे का?... कारण नसताना माझी स्तुती केली, त्यामुळे माझं मन भारावून गेलं. पण खरं सांगतो. काल, आज आणि उद्या जे करणार ते तुम्हा सगळ्यांना आणि या मान्यवरांना केंद्रबिंदू ठेऊन, माझं कर्तव्य म्हणून करणार. त्यात कुठेही कमी पडणार नाही. असं उदयनराजे यावेळी म्हणाले.

‘सत्ता असो वा नसो त्याला फार किंमत देत नाही. पण मात्र, जोपर्यंत ताकद आहे. तोवर तुमच्या सगळ्यांसाठी लढणार. आपण सर्व वेळ काढून आलात त्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली. अनेकांनी त्यांचं मनोगत व्यक्त करताना माझं एवढं कौतुक केलं. मला वाटलं आता मला डायबेटिस व्हायचा. पण खरोखर ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की, आपल्या सर्वांचं प्रेम कायमस्वरुपी मिळत राहो. यामुळे काम करत राहण्याची एक उर्जा मिळते.’ असं बोलत उदयनराजे काही क्षण भावुक झाले.

‘आज फार बोलण्यापेक्षा फक्त एकच सांगेन की, आपण एवढं प्रेम दिलं त्यानेच मी धन्य झालो. मला आज शब्द अपुरे पडतात. फक्त एवढीच विनंती करतो. मी सुद्धा तुमचा सारखाच एक माणूस आहे. कदाचित अनावधानाने चूक झाली असेल, होत असेल तर मला जरुर सांगत जा. तुमच्या प्रेमाचा माझ्याकडून अवमान होणार नाही.’ असंही उदयनराजे म्हणाले.

‘भाऊसाहेब एक गंमत म्हणून सांगतो, मागे एका सभेत मी म्हणालो होतो की, 365 दिवस 24 तास कधीही मला हाक मारा, मी तुमच्या सेवेशी हजर आहे. रात्री पावणे दोन वाजले होते, मला फोन आला. मी उचलला, मला वाटलं काही महत्त्वाचं काम आहे. मला वाटलं जायला हवं. दोन मुलं होती, ते म्हणाले. काय नाही, आत्ताच पिक्चर सुटला. तुम्हीच सांगितलं 365 दिवस 24 तास कधीही फोन करा, म्हणून केला. मी म्हटलं आत्ता आहात कुठे? म्हणाले, मोती चौकात आहोत. म्हणालो, थांबा तिथंच मी आलोच, हा झाला गंमतीचा भाग... काय आहे, जिल्ह्यातील विकासासंदर्भात काहीही काम असो, समस्या असो. कधीही घेऊन या त्या मार्गी लावल्या जातील. असं यानिमित्तानं मी तुम्हाला सांगतो.’ असं आवाहनही त्यांनी जनतेला यावेळी केलं.

'खरंच आज फार बोलण्यापेक्षा एकच सांगतो आज तुमच्यामुळे मी आहे. इतरांसारखं कोणी बोलत असेल की, माझ्यामुळे सगळं जग आहे. पण मी सांगतो, समाजामुळे आमच्यासारखे लोकं आहेत. हे मी कदापि विसरणार नाही.' असंही उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, उदयनराजे भोसलेंच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

VIDEO :संबंधित बातम्या :

उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी ते मुक्त विद्यापीठ आहेत : मुख्यमंत्री
खा. उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त जंगी कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Udayanraje Bhosale Speech at Satara latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV