...म्हणून आई आजही आठवड्यातून एकदा उपवास करते : रितेश देशमुख

रितेश देशमुख निर्मित ‘फास्टर फेणे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच सिनेमाच्या निमित्ताने रितेशनं माझा कट्टावर दिलखुलास गप्पा मारल्या.

...म्हणून आई आजही आठवड्यातून एकदा उपवास करते : रितेश देशमुख

मुंबई : ‘देशात जेव्हा सर्वात मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा लालबहादूर शास्त्रींनी जनतेला आवाहन केलं होतं की, सर्वांनी एक दिवस उपवास करा. जेणेकरुन अन्नाची बचत होईल. त्यावेळी माझी आई सात ते आठ वर्षांची असेल. पण आजही ती घटना लक्षात ठेऊन आई दर आठवड्याला उपवास करते.’ अशी माहिती अभिनेता रितेश देशमुखनं ‘माझा कट्टा’वर दिली. प्रेक्षकांना हा कट्टा आज (शनिवारी) रात्री 9.00 वाजता पाहता येईल. याचबरोबर एबीपी माझाच्या वेबसाइट, फेसबुक आणि ट्विटरवरही हा कट्टा पाहता येणार आहे.

रितेश देशमुख निर्मित ‘फास्टर फेणे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच सिनेमाच्या निमित्ताने रितेशनं माझा कट्टावर दिलखुलास गप्पा मारल्या. त्यावेळी त्याने आपल्या अनेक जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.

 ‘...म्हणून आई आठवड्यातून एक दिवस उपवास करते’

2 ऑक्टोबर रोजी रितेशनं शेतावर जाऊन काम करत असल्याचा एक व्हिडीओ अपलोड केला होता. त्याचनिमित्त त्याला प्रश्न विचारण्यात आला.

‘मला शेतीतलं फार काही कळत नाही. पण आमची सर्व शेती माझी आई पाहते. मी जेव्हा लातूरला जातो. तेव्हा-तेव्हा ती मला शेतावर घेऊन जाते. ते पाहून फार बरं वाटतं. आजही ती शेतीत लक्ष घालते हे खरंच कौतुकास्पद आहे. 2 ऑक्टोबरला दोन महान व्यक्तींची जयंती असते. महात्मा गांधी हे फार मोठं व्यक्तीमत्व आहे. पण लालबहादूर शास्त्री हे देखील तितकेच मोठे नेते होते. इतकंच नाही तर ते मातीशी जोडलेले होते. म्हणून मी त्यादिवशी 'जय जवान, जय किसान' याबाबतचं ट्वीट केलं होतं’ असं रितेश म्हणाला.

‘पण यामागे आणखी एक गोष्ट आहे. जी तुम्हाला बहुदा माहित नसेल. देशात जेव्हा सर्वात मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा लालबहादूर शास्त्रींनी जनतेला आवाहन केलं होतं की, सर्वांनी एक दिवस उपवास करा. जेणेकरुन अन्नाची बचत होईल. त्यावेळी माझी आई सात ते आठ वर्षांची असेल. पण आजही ती घटना लक्षात ठेऊन आई दर आठवड्याला उपवास करते. मातीशी जोडलेल्या  नेत्यांनाच जनता मानते आणि याचं उदाहरण माझ्या घरातच आहे.’ असं रितेश यावेळी म्हणाला.

‘तू तुझ्या नावाची काळजी घे, मी माझ्या नावाची काळजी घेईन.’

माझा कट्टावर बोलताना रितेश देशमुखनं दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याही आठवणींना उजाळा दिला. सिनेमात काम करण्याबाबत वडिलांना कसं सांगितलं? या प्रश्नाला उत्तर देताना रितेश थोडासा हळवा झालेला पाहायला मिळला.

‘मला सुरुवातीला एका सिनेमाची ऑफर आली तेव्हा पप्पा मुख्यमंत्री होते. वेळेअभावी माझी आणि त्यांची भेट होत नव्हती. तसं मी आईच्या कानावर ही गोष्ट घातली होती. तेव्हा तूच वडिलांना सांग असं तिने मला सांगितलं. एके दिवशी मी साहेबांना सांगितलं की, मला सिनेमाची ऑफर आली आहे. ते म्हणाले ‘निर्माता होणार?’ मी म्हटलं नाही... हिरोचा रोल आहे. त्यांनी तात्काळ मला परवानगी दिली. पण त्यावेळी माझ्या मनात जे आलं ते मी त्यांना सांगितलं. हा सिनेमा जर फ्लॉप झाला तर रितेश देशमुखनं वाईट काम केलं असं कुणीही म्हणणार नाही. मुख्यमंत्री विलासरावांच्या मुलानं वाईट काम केलं असंच सगळे म्हणतील. माझ्यामुळे तुमच्या नावाला धक्का लागेल. यावर साहेब एकच बोलले. ‘तू तुझ्या नावाची काळजी घे, मी माझ्या नावाची काळजी घेईन.’ हे ऐकल्यानंतर मी निश्चिंत झालो.’ असं रितेश यावेळी म्हणाला.

‘साहेबांचं मुख्यमंत्रीपद गेल्याची खंत माझ्या मनात कायम राहिल’

‘26/11 नंतर साहेबांचं मुख्यमंत्रीपद गेलं याची खंत माझ्या मनात कायम राहिल. हल्ल्यानंतर आम्ही ताजमधील परिस्थिती पाहायला गेलो होतो. पण त्यावेळी सिनेमासाठीवैगरे आम्ही गेलो नव्हतो. पण तेव्हाची वेळ खराब होती. लोकांना प्रचंड त्रास झाला होता. तेवढाच त्रास मला स्वत:ला देखील झाला होता. याआधीही अनेकदा मी साहेबांसोबत बऱ्याच ठिकाणी गेलो होतो. पण तेव्हा माझे फोटो तेव्हा आले नसावे. यावेळी आले हेच दुर्दैव. पण त्यानंतर त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. ती खंत आजही कायम आहे.’ असंही रितेश यावेळी म्हणाला.

‘मला राजकारण खूप आवडतं’

‘मी कधी राजकारणात जाईन असं मला वाटत नाही. पण मला राजकारण खूप आवडतं. त्याकडे बरंच बारकाईनं लक्षही देतो. पण मी राजकारणात जाईन असं वाटत नाही.’ असंही रितशने माझा कट्टावर सांगितलं.

दरम्यान, माझा कट्टावर बोलताना रितेश देशमुखनं फास्टर फेणे सिनेमाबाबतचे अनेक खास किस्सेही सांगितले आहेत.

PROMO :

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Actor Riteish Deshmukh on majha katta
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV