शोमॅन राज कपूर यांच्या 'आर. के. स्टुडिओ'चा इतिहास

राज कपूर यांच्या निधनानंतर आर. के. स्टुडिओची सूत्रं रणधीर कपूर यांच्या हातात आली. सध्या ऋषी कपूर आर. के. स्टुडिओचा कारभार सांभाळतात

शोमॅन राज कपूर यांच्या 'आर. के. स्टुडिओ'चा इतिहास

मुंबई : मुंबईतल्या आर. के स्टुडिओला लागलेल्या आगीची दृश्य पाहिल्यानंतर संपूर्ण बॉलिवूडच्या काळजात धस्स झालं असणार. ज्या राज कपूर यांच्या नावानं हा स्टुडिओ उभारण्यात आला, त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांच्या डोळ्यासमोरुन आर. के. स्टुडिओचा आतापर्यंतचा प्रवास नक्कीच तरळला असणार.

योगायोग म्हणा की आणखी काही, आर. के. स्टुडिओमध्ये चित्रित झालेल्या पहिल्या चित्रपटाचं नावही 'आग' होतं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी, म्हणजे 1948 मध्ये राज कपूर यांनी मुंबईतल्या चेंबूर परिसरात आर. के. स्टुडिओची उभारणी केली. बॉलिवूडमध्ये वर्चस्व राखणाऱ्या कपूर घराण्याशी संबंधित असल्यामुळे आर. के. स्टुडिओला अल्पावधीतच प्रसिद्धी मिळाली.

या स्टुडिओत चित्रित झालेले चित्रपट चांगलेच गाजले. त्यातले बहुतांश हे राज कपूर म्हणजे आर. के फिल्मचे होम प्रोडक्शन होते.

1948 साली आगची निर्मिती केल्यानंतर 1949 मध्ये आलेला बरसात, 1951 मधला आवारा, 1953 मधला आह, असे सुपर डुपर हिट चित्रपट आर. के. प्रोडक्शननं दिले. राज कपूर यांच्या प्रसिद्धीचं वलय असल्यामुळे आर. के. स्टुडिओची यशस्वी घौडदोड सुरुच होती.

1954 मध्ये आलेला बूट पॉलिश, 1955 मधला श्री 420, त्यानंतर आलेले जागते रहो, जिस देश मे गंगा बहती है अशा गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती आर. के. स्टुडिओमध्येच झाली.

60 आणि 70 च्या दशकातला संगम, मेरा नाम जोकर, कल आज और कल आणि बॉबी सारख्या अनेक चित्रपटांतले महत्त्वाचे सीन आणि गाणी आर. के स्टुडिओमध्येच शूट झाली.

सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग, राम तेरी गंगा मैली, हिना, प्रेम ग्रंथ असे सुपर डुपर हिट चित्रपटांच्या निर्मितीमुळे बॉलिवूड वर्तुळात आर. के. फिल्म आणि पर्यायानं आर. के स्टुडिओचा दबदबा कायम राहिला.

आर. के. स्टुडिओची खासियत म्हणजे इथे शूट होणाऱ्या चित्रपटाचे कॉस्च्युम स्टुडिओमध्ये संग्रहित ठेवले जातात. राज कपूर यांच्या निधनानंतर आर. के. स्टुडिओची सूत्रं रणधीर कपूर यांच्या हातात आली. सध्या ऋषी कपूर आर. के. स्टुडिओचा कारभार सांभाळत असल्याचं समजतं.

मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे चित्रपटांशिवाय, लहान-मोठ्या टीव्ही सिरियल्स आणि रिअॅलिटी शोच्या चित्रिकरणासाठी आर. के स्टुडिओलाच पसंती दिली जाते. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'व्हेन हॅरी मेट सेजल' या चित्रपटातले काही सीन आर. के. स्टुडिओमध्येच शूट झाले होते.

आर. के. स्टुडिओ म्हणजे बॉलिवूडच्या अनेक अमूल्य आठवणींचा साक्षीदार आहे. आगीत आर. के. स्टुडिओचा काही भाग जळून खाक झाला असला तरी या ऐतिहासिक आठवणी अमर आहेत.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV