कपिल शर्माचा शो आणखी एक वर्ष सुरु राहणार

सोनी चॅनलने कपिल शर्माच्या कार्यक्रमासंदर्भातील करार एका वर्षाने वाढवला आहे.

कपिल शर्माचा शो आणखी एक वर्ष सुरु राहणार

मुंबई : सुनील ग्रोव्हरसोबतच्या वादानंतर कपिल शर्माच्या कार्यक्रमाचा टीआरपी घसरला होता. त्यामुळे कपिल शर्माचा शो बंद होण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आणखी एक वर्षासाठी सोनी चॅनलने कपिल शर्मासोबत करार वाढवला आहे.

सोनी चॅनलकडून कपिलसोबतच्या करारासंदर्भात पत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये म्हटलंय की, कपिल शर्मा उत्कृष्ट कॉमेडियन आहेत आणि त्यांच्या शोमुळे कोट्यवधी प्रेक्षक खळखळून हसतात. त्यामुळे कपिलसोबतचा करार वाढवण्याचा विचार चॅनलने केला आहे.

सोनी कंपनी करार संपवणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. त्यामुळे सोनी कंपनीच्या नव्या पत्रकामुळे कपिल शर्मालाही दिलासा मिळाला आहे आणि चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.

खरंतर मार्च किंवा एप्रिल महिन्यात करार वाढवण्याची प्रक्रिया पूर्ण होणं गरजेची होती. मात्र, कार्यक्रमाच्या सातत्याने घसरणाऱ्या टीआरपीमुळे करार वाढवला गेला नव्हता. त्याचवेळी चॅनलवर ‘द ड्रामा कंपनी’ लॉन्च करुन एकप्रकारे कपिलला इशारा देण्यात आला होता.

दरम्यान, कपिलसोबत आता एक नवीन लेखक जोडला गेला आहे. लेखक राज शांडिल्य आता कपिलसोबत काम करणार आहेत. वेलकम बॅक, फ्रीकी अली यांसारखे सिनेमे राज शांडिल्य यांनी लिहिले आहेत.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV