रिव्ह्यू : हिंदी मीडियम

रिव्ह्यू : हिंदी मीडियम

इरफान असल्यावर त्या गोष्टीला तो एका वेगळ्या उंचीवर नेणार, अशी भावना सिनेमा पाहण्याअगोदर असते, असं नाव इरफानने कमावलं आहे. हिरो मटेरिअलच्या ढोबळ व्याख्येपलीकडचा स्टार अभिनेता. हिंदी मीडियम म्हटल्यावर आपल्याला जे वाटतं की, मुलाला कोणत्या माध्यमात शिकवायचं या निर्णयावर सिनेमा बेतला असेल, पण हा तर मूळ मुद्याला हात घालतो. आजच्या काळात मुलाला उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रत्येक पालक झटत असतात, त्या पालकांची होणारी कुचंबणा अन् त्या सगळ्या धबडग्यात पालकांचे मुलांच्या अॅडमिशन प्रोसेसमध्ये काय हाल होतात, त्याचे वेगवेगळे अवतार आपल्याला इथे पाहायला मिळतात. पण हे सारं पाहताना पुलंचं बिगरी ते मॅट्रिक... वा चितळे मास्तर आठवल्याखेरीज राहत नाही.

एका मॅगझिनमध्ये प्रतिष्ठित शाळांची यादी प्रसिद्ध होते, अन् त्यावरुन राज बत्रा म्हणजे इरफान अन् त्याची पत्नी मिठ्ठू म्हणजे सबा कमर. या दोघांना त्यांची मुलगी पियाला शिकवायचंय तेही या प्रतिष्ठित शाळेतच. आता त्यांच्यासमोर यक्षप्रश्न उभा राहतो. कारण राज बत्रा तर सरकारी शाळेत शिकलाय, पण इंग्रजीचे वांदे आहेत. मिठ्ठूला मात्र स्टेटस... हाय सोसायटी या सगळ्यांचं अनामिक आकर्षण आहे.

आता तिच्या हट्टापायी राजची फरफट होतेय... अन् परिणामी मुलीचीही.

कारण राज हा चाँदनी चौकात लहानाचा मोठा झालेला अन् आता मुलीची अॅडमिशन घेणार म्हणून तर बायकोच्या हट्टाने चक्क वसंत विहारमध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतलेला असा नवरा. मग कोणत्या शाळेत घ्यायचं अॅडमिशन घ्यायंच यासाठी असलेल्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेसपासून शाळेत अॅडमिशनची सेटिंग कशी करायची इथपर्यंत सारं काही राजला शिकावं लागतं... खरं तर अॅडमिशन प्रोसेस अन् भाषेवर सिनेमा असेल असं वाटत राहतं, पण आता गरीब कोट्यातून अॅडमिशन घ्यायचं म्हणून तो बैठ्याचाळीत गरीब बनून राहायला जातो, अन् तिथे श्यामकुमार म्हणजे दीपक डोब्रियाल भेटतो अन् या ट्रॅकनंतर सिनेमा पण ट्रॅकवर येतो अन् गती मिळते.

कारण शाळा, अॅडमिशन, हिंदी इंग्लिशच्या पलीकडे इमोशनल भाग सुरु होतो अन् ते सिनेमाचं मर्म इथे दडलेलं आहे.

शाहरुख जुहीच्या फिर भी दिल है हिंदुस्थानीचा असिस्टण्ट डिरेक्टर असणारा प्यार के साइड इफेक्ट्सचा दिग्दर्शक साकेत चौधरी हा छोट्या छोट्या गोष्टींचा आयुष्यावर होणारा गहिरा परिणाम तितक्याच रंजक पद्धतीने दाखवणारा दिग्दर्शक म्हणून साकेतकडे पाहता येईल. त्याने ज्या पद्धतीने हा विषय हाताळला आहे. पूर्वार्ध हा काहीसा प्रेडिक्टेबल आहे, कारण प्रोमोजमध्ये दिसणाऱ्या गोष्टींच्या पलीकडे जात नाही, पण उत्तरार्धात मात्र सारं काही अनपेक्षित आहे. रियलायझिंग पॉईंटसाठी केलेला ड्रामा महत्त्वाचा वाटतो.

इरफान हा कसलेला अभिनेता आहे, ते सांगायला माझी गरज नाही. या सिनेमात तर त्याने राज बत्रा ज्याप्रकारे साकारलाय. टेलर ते महिलांचे कपडे विकणाऱ्या शोरूमचा मालक असणारा बोलबच्चन गिऱ्हाइक महिलांना क्षणार्धात पटवणारा पण बायकोच्या हट्टासमोर हात टेकणारा अन् तिच्या आनंदासाठी स्वतःला बदललायला सज्ज झालेला असा कलंदर नवरा. तितकाच उत्तम माणसापर्यंतचं संक्रमण त्याने इतक्या खुबीने दाखवला आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये इरफानने ज्या जागा शोधल्या आहेत. त्याची पत्नीसोबतची जुगलबंदी, दीपक डोब्रियालसोबतचे सीन्स मुलीसोबतची केमिस्ट्री छान वाटते. सबा कमरने साकारलेली पत्नी स्टेटस सिम्बलसाठी झटणारी पत्नी अन् मुलीची काळजी करणारी आई अन् मुलीच्या त्रागा करून घेणारी अशी आई तिने तितक्याच सफाईने साकारलीय. पण या सगळयामध्ये दीपक डोब्रियाल उत्तरार्धात येतो, पण भाव खाऊन जातो. त्याचं व्यक्त होणं अन् त्यामधील सफाई. तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्समधील दीपक डोब्रियाल इथे इरफानसमोर उठून दिसतो. प्राचार्या झालेली अमृता सिंगला मात्र वाया घालवलंय असं वाटतं. संजय सूरी अन् नेहा धूपिया लोणच्यासारखे आहेत.

लक्ष्मण उतेकरचा कॅमेरा अत्यंत प्रभावीपणे बोलतो. मुळात या सिनेमात कलाकुसर दाखवायला जागा नाही, पण काही फ्रेम्स या नजाकतभऱ्या आहेत. त्यामधील जागा त्याने उत्तम पद्धतीने अधोरेखित केल्या आहेत. सचिन जिगरचं संगीतही सिच्यूएशनल आहे.

कोणत्या शाळेत जातो यापेक्षा मुलगा काय शिकतो अन् भाषेपेक्षा संवादासाठी काय लागतं. मुलाला जगाच्या शाळेत शिकण्यासाठी काय आवश्यक आहे, याची जाणीव पालकांना करून देणारा सिनेमा आहे.

का पाहावा - इरफान खान अन् दीपक डोब्रियालसाठी शाळेत अॅडमिशन घ्यायचं असेल तर काय करावं लागतं, याच्या पूर्वतयारीसाठी

का टाळावा - पूर्वार्ध हा प्रेडिक्टेबल आहे.

थोडक्यात काय - अॅडमिशन प्रोसेसचा खेळखंडोबा अन् इरफानची खमंग फोडणी

या सिनेमाला मी देतोय साडे तीन स्टार्स.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV