अमेझॉनला लाखो रुपयांचा गंडा, डिलिव्हरी बॉयसह 4 जण अटकेत

भिवंडीमध्ये अमेझॉनकडून ग्राहकांना येणारे पार्सल फोडून त्याऐवजी साबणाच्या वड्या त्यात भरणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अमेझॉनला लाखो रुपयांचा गंडा, डिलिव्हरी बॉयसह 4 जण अटकेत

भिवंडी : भिवंडीमध्ये अमेझॉनकडून ग्राहकांना येणारे पार्सल फोडून त्याऐवजी साबणाच्या वड्या त्यात भरणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 57 मोबाईल, 3 लॅपटॉप असा एकूण 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यंत चार जणांना अटक केली असून मुख्य आरोपी  उमेश गुळवी, टेम्पो चालक हुसैन रफिकुद्दीन, अमेझॉन कंपनीचे माजी कर्मचारी संदीप सराफ, सचिन पटाळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

भिवंडी तालुक्यातील दापोडा  येथील डिलिव्हरी डॉट कॉम या कुरिअर कंपनीच्या माध्यमातून अमेझॉन कंपनी ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यत पोहचवते. अशावेळी ग्राहकांनी वस्तू स्वीकारण्यास नकार दिल्यास अथवा पत्ता न सापडल्यास त्या वस्तू डिलिव्हरी डॉट कॉम कंपनी सीलबंद करुन पुन्हा माघारी अमेझॉनकडे  पाठवीत असे. परंतु मागील चार महिन्यात अमेझॉन कंपनीस मिळणाऱ्या वस्तूंची गोळाबेरीज जमत नसल्याने त्यांनी डिलिव्हरी डॉट कॉम कंपनीकडे याबाबत तक्रार केली.

ही माहिती मिळताच कुरिअर कंपनीचे सुरक्षा अधिकारी मंगेश मोहिते यांनी नारपोली पोलीस ठाण्यात २४ लाख  रुपयांच्या माल गहाळ झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरु करत चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेझॉनच्या ज्या किमती वस्तू डिलिव्हरी डॉट कॉम कुरिअर कंपनीकडे माघारी येत होत्या त्या अमेझॉनकडे परत पाठविण्याची जबाबदारी उमेश गुळवी याची होती. पण उमेश गुळवी हा टॅम्पो ड्रायव्हरच्या मदतीने बॉक्समधील वस्तू काढून रिकामे बॉक्स किंवा त्यात साबणाच्या वड्या भरुन अमेझॉनला परत करायचा. याचवेळी अमेझॉनमधील कर्मचारी संदीप सराफ आणि सचिन पटाळे यांनीही उमेश गुळवीशी संधान बांधलं होतं. त्यामुळे उमेशने पाठवलेले रिकामे बॉक्स संदीप आणि सचिन कोणतीही शाहनिशा न करता स्वीकारत होते.

ऑक्टोबर २०१७ पासून ही टोळी अशा पद्धतीने काम करीत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. या चौघांनाही भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी सलोख चौकशी सध्या सुरु आहे.

संबंधित बातम्या :

कुरिअर कंपनीकडूनच अमेझॉनला तब्बल 3 लाखांचा गंडा

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 4 held for stealing smartphone and laptop in Bhiwandi latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV