भिवंडीत भटक्या कुत्र्यांची दहशत, या वर्षात तब्बल 4216 जणांना चावा

भिवंडीत जानेवारी 2017 ते ऑगस्ट 2017 या आठ महिन्यात भिवंडीत तब्बल 4 हजार 216 जणांना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मोकाट कुत्र्यांना रोखण्यासाठी महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना राबवल्या जात नाहीत.

भिवंडीत भटक्या कुत्र्यांची दहशत, या वर्षात तब्बल 4216 जणांना चावा

भिवंडी : भिवंडी शहरातील कामतघर परिसरात राहणाऱ्या आठ वर्षांच्या धीरज यादवचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यामुळे भिवंडीतील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने भिवंडीतील सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला. यात जानेवारी 2017 ते ऑगस्ट 2017 या आठ महिन्यात भिवंडीत तब्बल 4 हजार 216 जणांना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्याचं समोर आलं.

या वर्षातील कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना

  • जानेवारी – 829

  • फेब्रुवारी – 736

  • मार्च – 884

  • एप्रिल – 538

  • मे – 150

  • जून – 342

  • जुलै – 372

  • ऑगस्ट – 365

  • चालू सप्टेंबर महिन्यात दिवसाला 25 ते 30 घटना


सहा वर्षांपासून निर्बिजीकरण प्रक्रिया नाही

ही सगळी आकडेवारी पाहिल्यानंतर तुम्हालाही महापालिकेचा संताप आला असेल. एबीपी माझाने कुत्र्यांचं निर्बिजीकरण होतंय की नाही, याची माहिती घेतली असता धक्कादायक वास्तव समोर आलं. भिवंडी महापालिकेने 2011 पासून निर्बिजीकरणाचं टेंडरच काढलेलं नसून सध्या शहरात 4 हजार 753 कुत्रे मोकाट फिरत आहेत. त्यामुळे यापैकी कुठला कुत्रा येऊन आपला कधी लचका तोडतो, याची धास्ती भिवंडीकरांनी घेतली आहे.

दरम्यान याबाबत एबीपी माझाने महापालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना जाब विचारला. मात्र यावर्षी कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. एका कुत्र्याचं निर्बिजीकरण करण्यासाठी 1254 रुपये ठेकेदाराला देण्यात येणार असून त्यापोटी 60 लाख रुपये महापालिका खर्च करणार आहे. मात्र मागील सहा वर्षात टेंडर का निघालं नाही, याचं उत्तर आयुक्तांनाही देता आलं नाही.

ही सर्व परिस्थिती पाहता भिवंडी महापालिका प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत किती उदासीन आहे, हे स्पष्ट होतं. त्यामुळे आता तरी महापालिका कुत्र्यांचं निर्बिजीकरण करते का? आणि भटक्या कुत्र्यांचा हा त्रास थांबतो का? असा प्रश्न भिवंडीकरांना पडला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: bhiwandi dog कुत्री भिवंडी
First Published:
LiveTV