एक दिवस.. 7 अपघात.. 30 ठार.. शनिवार ठरला अपघातवार

फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरातील नऊ शहरांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून झालेल्या विविध अपघातांमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे.

एक दिवस.. 7 अपघात.. 30 ठार.. शनिवार ठरला अपघातवार

मुंबई : महाराष्ट्रासाठी शनिवारचा दिवस घातवार ठरला आहे. दिवसाची सुरुवात झाली, तीच सांगलीत पाच पैलवानांसह सहा जणांच्या मृत्यूच्या बातमीने. डहाणूतील बोट दुर्घटना, ओएनजीसी हेलिकॉप्टर समुद्रात कोसळून झालेला अपघात यासारख्या घटनांमध्ये काही जणांनी प्राण गमावले.

फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरातील नऊ शहरांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून झालेल्या विविध अपघातांमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे.

सांगलीत क्रूझरच्या अपघातात पाच पैलवानांसह 6 जणांचा मृत्यू

सांगलीतील वांगीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच तरुण पैलवान आणि गाडीचालक अशा सहा जणांचा मृत्यू झाला, तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. साताऱ्यातून कुस्ती खेळून परतताना हा अपघात घडला. शिरगाव फाट्याजवळ ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि क्रूझर यांची धडक होऊन भीषण अपघात झाला.

डहाणूमध्ये 40 विद्यार्थ्यांना नेणारी बोट समुद्रात उलटली

डहाणूमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेलेली बोट उलटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बोटीत 40 विद्यार्थी होते, त्यापैकी 32 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आलं, मात्र दोघी विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाला. बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध सुरु आहे. सेल्फी घेताना तोल जाऊन बोट कलंडल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

ओएनजीसीचं हेलिकॉप्टर डहाणूजवळ समुद्रात कोसळलं

ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे अवशेष डहाणूजवळच्या समुद्रात सापडले आहेत. तिघांचा मृत्यू झाला असून इतरांचा शोध सुरु आहे. ओएनजीसीच्या डाऊफिन एएस 365 एन3 या हेलिकॉप्टरचा सकाळी साडेदहाच्या सुमारास संपर्क तुटला होता. या हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह ओएनजीसीचे पाच कर्मचारी प्रवास करत होते.

राजकोटमधील आगीत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

राजकोटच्या उपलेटामध्ये राष्ट्रकथा शिबीरात आग लागून तीन विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर 15 जण जखमी आहेत. या शिबीरात 50 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.

जयपूरमध्ये सिलेंडर स्फोटात एकाच कुटुंबातले पाच ठार

जयपूरमधील विद्याधरनगर भागात झालेल्या सिलेंडर स्फोटात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. दोन सिलेंडरच्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत घरातील सदस्य अडकले आणि त्यांचा भाजून मृत्यू झाला. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र कुटुंबीयांना वाचवण्यात यश आलं नाही.

कर्नाटक बस तलावात कोसळून 8 जण मृत्युमुखी

कर्नाटकमध्ये हासन तलावात प्रवाशांनी भरलेली KSRTC ची बस कोळून मोठा अपघात झाला. यामध्ये 8 जणांना जीव गमवावा लागला, तर 15 जण जखमी आहेत. पहाटे साडेतीनच्या सुमारास चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला.

कर्नाटकात रिक्षा झाडावर आदळून तिघांचा अंत

कर्नाटकमध्ये रिक्षा झाडावर आदळून झालेल्या अपघातात तीन जण जागीच मृत्युमुखी पडले, तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. देवदर्शनाहून परतताना रिक्षाचालकाचा रिक्षावरील ताबा सुटून हा अपघात झाला.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Accidents in Maharashtra on Saturday latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV