झोपेत चुकून पाय लागला तर लैंगिक अत्याचार कसा? : दिव्या सचदेव

शनिवारी रात्री दिल्लीहून मुंबईत येत असताना विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात विकासने विनयभंग केल्याचा आरोप झायरा वासिमने केला आहे.

झोपेत चुकून पाय लागला तर लैंगिक अत्याचार कसा? : दिव्या सचदेव

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री झायरा वासिमसोबतच्या छेडछाड केल्याप्रकरणी एकाला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. विकास सचदेव असं या आरोपीचं नाव आहे. आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

विकास सचदेव एका नावाजलेल्या मनोरंजन कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत असल्याचं समजतं. शनिवारी रात्री दिल्लीहून मुंबईत येत असताना विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात विकासने विनयभंग केल्याचा आरोप झायरा वासिमने केला आहे.

झायराशी विमानात असभ्य वर्तन करणारा अटकेत!

परंतु आरोपीच्या पत्नी दिव्या सचदेव यांनी मात्र झायराचे सर्व आरोप फेटाळले आहेत. याबाबत दिव्या सचदेव यांनी एबीपी माझाशी बातचीत करताना माझा पती निर्दोष असून झायरा लाईमलाईटसाठी हे आरोप करत असल्याचं दिव्या सचदेव म्हणाल्या.

प्रश्न : झायरा वसिमच्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे?
उत्तर : विकास सचदेव यांच्या मामांचं निधन झालं होतं. त्यांच्या शोकसभेसाठी विकास सचदेव सकाळी पाच वाजता उठून सातच्या विमानाने दिल्लीला गेले होते. त्यानंतर रात्री 9.30 वाजता विस्ताराच्या विमानाने ते परत येत होते. जवळच्या व्यक्तींना गमावल्यानंतर तुम्ही दुख:त असता. विकास सचदेव आधीच त्या दुख:त होते. या दरम्यान ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकले होते. विमानात चढल्यावर विस्ताराच्या केबिन क्रूला, मला एक चादर द्या, मला झोपायचं आहे, मला जेवणासाठीही उठवू नका," असं सांगितलं होतं.

एखाद्या झोपलेल्या व्यक्तीचा पाय पुढच्या सीटपर्यंत गेला, तर तुम्ही त्याला लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग म्हणाल का? ते निरपराध आहेत. ते संसारी व्यक्ती आहेत. आमच्या लग्नाला 12 वर्ष झाली आहेत, आम्हाला 9 वर्षांचा एक मुलगा आहे. 40 वर्षांचा एक पुरुष हे कृत्य का करेल, तेही बिझनेस क्लासमध्ये, जिथे 300 लोक असताना?

एक स्त्री असताना आज माझ्यासोबत लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग झाला तर मी तेव्हाच प्रतिक्रिया देईन. मी दोन तासांची वाट पाहणार नाही. मी ओरडेन किंवा क्रूला बोलावेन, किंवा मी त्या व्यक्तीवर ओरडेन किंवा हात उगारेन. दोन तासांनी विमान लॅण्ड झाल्यानंतर ट्वीट आणि सोशल मीडियाचा आधार घेणार नाही.

प्रश्न : केबिन क्रू आणि प्रवाशांनी मदत केली नाही, असा झायरा वसिमचा आरोप आहे!
उत्तर : झायरा अल्पवयीन आहे तर तिच्या आईसोबत प्रवास करत होती. काही प्रॉब्लेम आहे, पण भीतीपोटी किंवा अल्पवयीन असल्यामुळे ती बोलू शकत नसेल, तर ती याबाबत आईला नक्की सांगेल. जर झायरा बोलली नाही तर तिच्या आईने प्रतिक्रिया का दिली नाही? त्या विकास सचदेवा यांच्यावर का ओरडल्या नाहीत किंवा केबिन क्रूला सांगून स्वत:ची किंवा प्रवाशाची सीट बदलायला का सांगितलं नाही? तिने अलार्म दाबला किंवा केबिन क्रूला मदतीसाठी बोलावलं, असा दावा झायरा करत आहे. पण प्रवाशासोबतचं गैरवर्तन किंवा असभ्य वर्तन कोणत्याही कंपनीचे क्रू सहन करणार नाही, कारण त्यांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न असतो.

प्रश्न : लाईट डीम असल्यामुळे त्या व्यक्तीचा व्हिडीओ बनवू शकली नाही, असं झायराने सांगितलं आहे!
उत्तर : जर कोणी पाय घासत असेल तर हालचाल दिसायला हवी, पण झायराच्या व्हिडीओमध्ये पाय स्थिर असल्याचं दिसत आहे. जर ती पायाचा व्हिडीओ बनवू शकत होती, तर ती माझ्या पतीचा फोटोही क्लिक करु शकली असती. लॅण्डिंग आणि टेकऑफच्या वेळीच लाईट डीम होते.

प्रश्न : विकास सचदेव यांची मानसिक स्थिती कशी होती?
उत्तर : विकास सचदेव 12.30-12.45 वाजता घरी आले आणि थकले असल्याने ते लगेचच झोपून गेले. सकाळी 10.30-11 वाजता ते उठले. पण अशाप्रकारच्या बातम्या दाखवल्या जात असल्याचं आम्हाला माहितच नव्हतं. ते घरात लागणारं साहित्य आणायला गेले होते. 11.30 वाजता मी घरी होते, त्यावेळी पोलिस आले. मी तातडीने विकास यांना फोन केला. त्यांना धक्काच बसला, असं नेमकं काय झालंय, हे त्यांना कळतच नव्हतं. पोलिस चौकीत गेल्यावर एका महिलेने आरोप केल्याचं कळलं.

त्यावेळी विकास सचदेव यांनी सांगितलं की, लॅण्ड होताना, अभिनेत्री म्हणाली होती की, तुम्ही तुमचे पाय माझ्या डोक्यावर का ठेवत नाही? यावर विकास सचेदव म्हणाले तिला की, मॅडम मी गाढ झोपेत होतो. सॉरी, तुम्हाला त्रास झाला असेल तर. मी माफी मागतो. तुम्हाला त्रास देण्याचा माझा हेतू नव्हता.

माझा एक प्रश्न आहे, आज लोकल ट्रेनमध्ये हजारो लोक प्रवास करतात, धक्काबुक्की होते. तर हजारो-करोडो लोक ह्याला विनयभंग म्हणतात का?

प्रश्न : झायरा हे आरोप का करतेय, असं तुम्हाला वाटतंय?
उत्तर : तिच्या आजूबाजूच्या लोकांमुळे ती प्रभावित होत असेल. किंवा तिला पब्लिसिटी हवीय, तिला फेम हवंय. फिल्म इंडस्ट्रीमधलं मला फार माहित नाही. पण वादात आलं तर तुम्हाला प्रसिद्धी मिळते. त्यामुळे हे फक्त लाईमलाईटमध्ये येण्यासाठी आहे.

प्रश्न : झायरा आधीच प्रसिद्ध आहे, तरीही ती हे का करेल?
उत्तर : आज तिच्याकडे फेम आहे, ती कणखर आहे. तिच्याकडे बॅकअप आहे. पण आमच्यासारख्या सामान्य माणसांनी कुठे जायचं? आमचा आवाज कोण ऐकणार? आज सकाळपासून रात्रीपर्यंत तिच्याच बातम्या, व्हिडीओ दाखवल्या जात आहेत. आमच्याकडे संध्याकाळपर्यंत कोणी आलं नाही. आम्ही कुठे जाणार?

प्रश्न : या घटनेनंतर विकास सचदेव यांची बदनामी झाली, असं वाटतंय का?
उत्तर : या घटनेचा इज्जतीशी काही देणं-घेणं नाही. सगळे नातेवाईक-मित्रमंडळी विकासला चांगले ओळखतात. मी 7 वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबईत राहते. आमच्या गूडविलसाठी लोकांना सांगत नाही, ती आपोआप बनते.

प्रश्न : झायराबाबत तुमच्या मनात द्वेष निर्माण झालाय का?
उत्तर : मी तिच्याबाबत फार बोलणार नाही. ती अतिशय चांगली अभिनेत्री आहे. तिच्या आजूबाजूंच्या लोकांमुळे प्रभावित होऊन लाईमलाईटमध्ये येण्यासाठी हे आरोप केले असावेत, असं मला वाटतं

काय आहे प्रकरण?
एअर विस्ताराच्या विमानाने झायरा दिल्लीहून मुंबईला येत होती. त्यावेळी विमानात झायराच्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीनं आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचं झायराने सांगितलं. विशेष म्हणजे या प्रकाराची विमानातील कर्मचाऱ्यांकडे तक्रार देऊनही कुणीही आपल्या मदतीला न आल्याचा दावा तिने केला आहे.

'दंगल गर्ल' झायराशी विमानात छेडछाड, केबिन क्रूचा कानाडोळा

सुरुवातीला विमान हेलकावे खात असल्याच्या कारणावरुन आपण दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर विमानातील दिवे बंद होताच त्याने पुन्हा असभ्य वर्तन केल्याचं झायराने सांगितलं. मी व्हिडीओ काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र लाईटच्या कमतरतेमुळे ते शक्य झालं नसल्याचं झायरा म्हणाली.

सीटच्या मागून हा इसम झायराच्या पाठीला आणि मानेला पाय लावत होता. केबिन क्रू किंवा विमानातील सहप्रवाशी आपल्या मदतीला न आल्याचंही झायराने सांगितलं.

झायराच्या तक्रारीला कोणीही दाद न दिल्यामुळे तिने मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर इन्स्टाग्राम लाईव्हवरुन आपली व्यथा मांडली. घडलेला प्रकार सांगताना झायरला अक्षरशः रडू कोसळलं. मुलींची तुम्ही अशी काळजी घेणार का? असा प्रश्न उपस्थित करताना तिला अश्रू अनावर झाले.

झायरा वसिमसोबत असभ्य वर्तन, पोस्को अंतर्गत गुन्हा

पोलिसात गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
दंगल गर्ल' झायरा वसिम सोबत विमानात झालेल्या असभ्य वर्तन प्रकरणी मुंबईतील सहार पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कलम 354 अन्वये आणि झायरा अल्पवयीन असल्यामुळे 'पोस्को' अंतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर रविवारी सकाळी विकास सचदेवला अटक करण्यात आली.

या प्रकाराची मुंबई पोलिसांसह महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे. तर विस्तारा एअरलाईन्सने याबाबत दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.

पाहा व्हिडीओ

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Bollywood actress Zaira Wasim molestation issue : Vikas Sachdev’s wife’s reaction
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV