पुनर्वसन विस्थापितांचं होतं, खडसे प्रस्थापित नेते : फडणवीस

गुजरातच्या विजयामुळे महाराष्ट्रात आम्ही अजून स्थिर झालो, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

पुनर्वसन विस्थापितांचं होतं, खडसे प्रस्थापित नेते : फडणवीस

मुंबई : नारायण राणेंचं भाजपमध्ये पुनर्वसन होणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना म्हणाले. पुनर्वसन हे विस्थापितांचं होतं, मात्र एकनाथ खडसे हे पक्षातले प्रस्थापित नेते आहेत, असंही यावेळी फडणवीसांनी सांगितलं.
गुजरात निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या.

'पुनर्वसन विस्थापितांचे होते. नाथाभाऊ प्रस्थापित नेते आहेत. राणेंचं पुनर्वसन होणार. ते आमच्यासोबत आहेत', असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. खडसे, राणे यांचा आऊटस्पोकन स्वभाव अडसर ठरण्यापेक्षा त्यांचा अनुभव आमच्यासाठी महत्वाचा
आहे. अशा व्यक्ती  पक्षाची संपत्ती असतात, असंही फडणवीसांनी सांगितलं. राणेंना आमच्या कोट्यातून घेणार, त्यामुळे शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्न नाही, अशी हमीसुद्धा फडणवीसांनी दिली.

'गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला 49.4 टक्के मतं मिळाली. देशाच्या राजकारणात विधानसभेत 50 टक्के मतं मिळवणारी सरकार फार कमी आहेत. त्यामुळे हा विजय अभूतपूर्व आहे' असं मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेस आणि भाजपमध्ये 9 टक्क्यांचा फरक आहे. मात्र भाजपला कन्व्हिंसिंग विजय मिळाला, असंही ते म्हणाले.

गुजरातच्या मागील तिन्ही निवडणुकांत ग्रामीण भागात काँग्रेस 55 टक्के मतांसह पुढे होतं. मात्र आता ग्रामीण भागात 50 टक्के काँग्रेस आणि 49 टक्के भाजप आहे, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या मदतीमुळे 99 जागा आल्या, हे हास्यास्पद असल्याचा दावाही फडणवीसांनी केला.

'नोटा'मध्ये मतदान वाढणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. सर्व पक्षांनी याचा विचार करावा, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.

गुजरात निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम काय?

गुजरातच्या विजयामुळे महाराष्ट्रात आम्ही अजून स्थिर झालो, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. वातावरण तयार झाल्यामुळे अनेक लोक कोलांट्या उडया मारत होते, असा टोलाही फडणवीसांनी हाणला. प्रत्येक निवडणुकीत सातत्याने महाराष्ट्रात भाजप पहिल्या नंबरचा पक्ष ठरल्याचं त्यांनी सांगितलं. 2016 पासून निवडणुकांत आम्हाला यश मिळत आहे, असंही फडणवीस म्हणाले.

आम्हाला कधी विजय न मिळालेल्या ठिकाणी विजय मिळत आहेत. आमचे सर्वाधिक सरपंच आहेत, असा दावाही फडणवीसांनी केला. इतर सर्व पक्ष विरोधात असताना अनेक ठिकाणी आमचा विजय होत आहे. तिन्ही पक्ष समोर असताना विजय झाला. म्हणजे भाजप हा पक्ष मजबूत होत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपसोबत शिवसेनेलाही लोकांनी मतदान केलं. अजूनही लोकांची काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाण्याची मानसिकता नाही, असं सांगत शिवसेनेच्या दुःखावर त्यांनी फुंकर घातली.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: CM Devendra Fadanvis on Eknath Khadse and Narayan Rane latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV