उद्धव ठाकरेंसमोर सेना मंत्री-आमदारांमध्ये खडाजंगी, निलम गोऱ्हे रडल्या!

खासदार श्रीरंग बारणे बोलल्यानंतर निलम गोऱ्हे रडल्या.

उद्धव ठाकरेंसमोर सेना मंत्री-आमदारांमध्ये खडाजंगी, निलम गोऱ्हे रडल्या!

मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. ‘मातोश्री’वरील शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत दोन वेळा खडाजंगी झाली. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला.

भरत गोगावले-रामदास कदम यांच्यात वाद


रायगडमधील आमदार भरत गोगावले आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यात वाद झाला.

“आगामी निवडणुकीत मंत्र्यांची भूमिका काय असणार?, असा प्रश्न आमदार भरत गोगावलेंनी विचारला. शिवाय, "मंत्र्यांनी आमच्याबरोबर व्यवस्थित बोलावं. आम्हाला मंत्री व्हायचं नाही.”, असेही गोगावले म्हणाले. यावर रामदास कदम हे गोगावलेंना उद्देशून म्हटले, “सर्व मंत्र्यांना एका पिंजऱ्यात उभं करु नका. सरळ मंत्र्यांचं नाव घ्या.” त्याचसोबत, “मी आत्ताच्या आत्ता ‘मातोश्री’वर राजीनामा द्यायला तयार आहे, असेही कदम म्हणाले.

भरत गोगावले आणि रामदास कदम काय म्हणाले?
भरत गोगावले : राणे जेव्हा पक्ष सोडून चालले होते, तेव्हा कोण निष्ठावंत होते, हे आम्हाला चांगलं माहीत आहे. तेव्हा आमच्यासारखे शिवसैनिक खंबीरपणे पक्षासोबत उभे होते. मंत्र्यांना आमच्याशी नीट बोलायला सांगा, त्यांना सांगा आम्हाला मंत्री बनायचे नाहीय. ग्रामपंचयातीच्या निवडणुका आल्या आहेत. आमचे मंत्री आम्हाला किती आर्थिक पाठबळ देणार? हे त्यांनी आता सांगावं.

रामदास कदम : भरत गोगावले तुम्ही मंत्र्यांचं नाव घ्या, सरसकट सर्वच मंत्र्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका. माझ्या खात्याचे अधिकार माझ्याकडेच नाहीत. त्यामुळे मी आता मातोश्रीत माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. याआधी आम्ही निवडणूक लढलो. तुमच्यापेक्षा जास्त लढलो, तेव्हा आम्ही निवडणूक बिनपैशांनी जिंकलो आहोत, हे लक्षात ठेवावे.

 निलम गोऱ्हे-श्रीरंग बारणेंमध्येही खडाजंगी

शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यात खडाजंगी झाली.

निलम गोऱ्हेंच्या वाढदिवसाला लक्ष्मण जगताप हे त्यांना भेटले होते. यावेळी निलम गोऱ्हेंनी जगताप यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. या गोष्टीवरुन खासदार श्रीरंग बारणेंनी गोऱ्हेंना उद्देशून म्हणाले, “असे निर्णय घेण्याचे अधिकार निलम गोऱ्हेंना कोणी दिले. आम्हाला शिवसेना शिकवू नये. आम्ही निवडणुका लढलो आहे.”

निलम गोऱ्हे आणि श्रीरंग बारणे काय म्हणाले?
श्रीरंग बारणे : निलम गोऱ्हेंनी भाजप आमदार लक्षण जगतापांना शिवसेनेत यावं असं आमंत्रित केलं. त्यांना हा अधिकार कोणी दिला? निलम गोऱ्हेंनी आम्हाला शिवसेना काय आहे, हे शिकवू नये.

निलम गोऱ्हे : माझी शिवसेनेवरची निष्ठा काय आहे, हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. मला माझी निष्ठा कोणाला सांगायाची गरज नाही.

विशेष म्हणजे खासदार श्रीरंग बारणे बोलल्यानंतर निलम गोऱ्हे यांना रडू कोसळलं.

एकंदरीतच ‘मातोश्री’वरील बैठकीत शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV