विनोद तावडेंच्या कार्यालयात टक्केवारी चालते, राष्ट्रवादीचा आरोप

अल्पसंख्यांक मंत्री विनोद तावडे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांच्या कार्यालयात टक्केवारी चालते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

विनोद तावडेंच्या कार्यालयात टक्केवारी चालते, राष्ट्रवादीचा आरोप

मुंबई : अल्पसंख्यांक विकास मंत्री विनोद तावडे यांच्या कार्यालयात टक्केवारी चालते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ओएसडी चारुदत्त शिंदे यांनी कामांसाठी एक लाख रुपये घेतल्याचा आरोप विनोद तावडे यांचे कक्ष अधिकारी शशिकांत साळुंखे यांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणाच्या एसीबी चौकशीची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

विनोद तावडेंच्या खात्यातील कक्ष अधिकारी शशिकांत साळुंखे यांनी अल्पसंख्यांक खात्यातील एक शासकीय आदेश, ज्यात कंत्राटदारांना काम देण्याचे आदेशच निघाले नव्हते, त्या कंत्राटदारांना काम देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात शशिकांत साळुंखे यांना निलंबित करण्यात आलं. शशिकांत साळुंखे यांनी प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्रात विनोद तावडे यांचे सचिव चारुदत्त शिंदे यांनी आपल्याला नाव टाकण्यास सांगितल्याचं नमूद केलं. शिवाय शिंदे यांनी एक लाख रुपये मगितल्याचा आरोपही केला.

चारुदत्त शिंदे हे केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांचे नातेवाईक असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. या प्रकरणात कारवाई न केल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे.

विनोद तावडेंनी आरोप फेटाळले

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आरोप विनोद तावडे यांनी फेटाळले आहेत. कक्ष अधिकाऱ्यांवर कारवाई केली म्हणून त्यांनी आरोप केल्याचा दावा तावडेंनी केला. प्रधान सचिवांनी त्यांना आरोप सिद्ध करायला सांगितलं. पण कक्ष अधिकारी ते सिद्ध करू शकलेले नाहीत. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी हा आरोप केल्याचं तावडेंनी म्हटलं आहे.

विनोद तावडे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निशाण्यावर आले आहेत. तावडेंकडून ओएसडी चारुदत्त शिंदे यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तर कक्ष अधिकाऱ्यांनी आरोप सिद्ध केले तर दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन विनोद तावडेंनी दिलं आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV