परदेशी मानांकनांवर विसंबून राहू नका, हायकोर्टाने डीजीसीएला सुनावलं!

'केवळ परदेशी मानांकनांवर विसंबून न राहता डीजीसीएनं भारतीय प्रमाणांनुसार एअरक्राफ्ट इंजिनची योग्यता तपासून मगच त्यांना वापरण्याची परवानगी द्यावी.'

परदेशी मानांकनांवर विसंबून राहू नका, हायकोर्टाने डीजीसीएला सुनावलं!

मुंबई : ‘विमान प्रवास करणाऱ्यांनी चिंता करण्याचं काही कारण नाही. कारण एअरबस निओ ३२० विमानांतील सीरिज ४५० च्या पुढील सर्व एअरक्राफ्ट इंजिन सेवेतून बाद ठरवण्यात आली आहेत.’ अशी हमी डीजीसीएनं सोमवारी हायकोर्टात दिली. तर सीरिज ४५० ते सीरिज ६१४ या दरम्यानचं कुठलंही इंजिन आमच्या सेवेत नाही अशी ग्वाही इंडिगोच्यावतीनं सोमवारी हायकोर्टात देण्यात आली. कारण कोणतंही एअरक्राफ्ट इंजिन हे ऑर्डर दिल्यास ८ तासांत उपलब्ध करून दिलं जातं. अशी माहितीही हायकोर्टाला करुन देण्यात आली.

डीजीसीएच्या दाव्यानुसार पी अँड डब्ल्यूचं एअरक्राफ्ट इंजिन हे पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यातून प्रवास करणाऱ्यांना कुठलाही धोका नाही. अमेरिकन बनावटीचं हेच इंजिन असलेली अनेक विमान जगभरात सेवेत आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरुन जाण्याचं अथवा चिंता करण्याचं कोणतही कारण नाही. त्यामुळे ही जनहित याचिका निकाली काढावी अशी विनंती डीजीसीए आणि केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.

'सर्व विमानांची नियमतपणे काटेकोर देखभाल केली जाते. असं असलं तरी केवळ परदेशी मानांकनांवर विसंबून न राहता डीजीसीएनं भारतीय प्रमाणांनुसार एअरक्राफ्ट इंजिनची योग्यता तपासून मगच त्यांना वापरण्याची परवानगी द्यावी.' असे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. या संदर्भात दाखल जनहित याचिकेवर पुढील सुनावणी आता ११ जून रोजी ठेवण्यात आली आहे.

भारतात देशांतर्गत हवाई वाहतूक करणाऱ्या इंडिगो आणि गो एअरच्या ए-३२० या विमानांतील ४५० आणि त्यापुढील सीरीजच्या इंजिनमध्ये काही तांत्रिक तुटी असल्याची बाब समोर आली. या इंजिनची निर्मिती करणाऱ्या पी अँड डब्ल्यू कंपनीनंच ही गोष्ट कबूल केली आहे. त्यामुळे इंडिगोची आणि गो एअरची सदोष इंजिन असलेली विमानं तात्काळ सेवेतून बाद करावीत अशी मागणी करत हरिष अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे.

फेब्रुवारी २०१८ मध्ये युरोपियन एअर सेफ्टी अथॉरिटीनं पी अँड डब्ल्यू ११०० इंजिनच्या काही ठराविक सीरिजमध्ये तांत्रिक दोष असल्याचा अहवाल सादर केला आहे. या दोषामुळे खासकरून खाऱ्या हवेत इंजिनमध्ये बिघाड निर्माण होऊन इंजिन फेल्युअरचा धोका निर्माण होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ही इंजिन बसवलेली विमानं मुंबई, चेन्नई, कोलकाता अश्या समुद्राजवळील भागात उडवू नयेत अशी प्रमुख मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Do not rely on foreign standards, the high court has told DGCA latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV