कोकणात नाणार प्रकल्प होणार नाही म्हणजे नाही : राज ठाकरे

रिफायनरी प्रकल्प न होऊ देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच नाणारवासियांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.

कोकणात नाणार प्रकल्प होणार नाही म्हणजे नाही : राज ठाकरे

मुंबई : नाणारचा प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही, राज्य सरकारला काय करायचं ते करावं, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितलं आहे. रिफायनरी प्रकल्प न होऊ देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच नाणारवासियांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.

मुंबईतील मुलुंडमध्ये मनसेच्या वतीने 100 महिलांना रोजगाराचं साधन म्हणून रिक्षांचं वाटप करण्यात आलं. यावेळी झालेल्या सभेत राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवरुन सरकारवर निशाणा साधला. जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार प्रकरणावरुनही त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला.

''नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही''

''नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही. हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही, तर गुजरातला जाईल,'' अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवतात. मात्र, गुजरातच का, असा सवाल करत प्रकल्प कुठेही न्या, पण तो कोकणात होणार नाही, राज्य सरकारला काय करायचं ते करावं, असं जाहीर आव्हान राज ठाकरेंनी दिलं.

''मुख्यमंत्री खोटं कुणासाठी आणि का बोलतात?''

''मुख्यमंत्री म्हणाले राज्यात एक लाख 20 हजार विहिरी बांधल्या आहेत. इथे राज्यात पाणी नाही आणि विहिरी कुठे बांधल्या? महाराष्ट्रातील 44.9 जमिनीचं वाळवंटीकरण होणार आहे, असा ‘इस्रो’चा रिपोर्ट आहे. मराठवाड्यात तर 1200 फूट खोल गेलं तरी पाणी मिळत नाही आणि तरी मुख्यमंत्री सांगतात की एक लाख 20 हजार विहिरी बांधल्यात. का आणि कशासाठी खोटं बोलताय?'' असा सवाल राज ठाकरेंनी केला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांची मिमिक्रीही राज ठाकरेंनी करुन दाखवली. यामुळे जोरदार हशा पिकला.

''भाजप बलात्काऱ्यांना पाठीशी घालतोय''

जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार प्रकरणावरुन राज ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केला. शिवाय भाजप बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभा राहत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आरोपी कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्याला तिथल्या तिथे ठेचून मारायला हवं, असंही राज ठाकरे म्हणाले.

''उस्मानाबादच्या शेतकऱ्यांना शिवसेना नगरसेवकाने हाकललं''

''उस्मानाबादचे मराठी शेतकरी मुंबईत भाजीपाला विकायला आले होते. शिवसेनेच्या नगरसेवकाने त्यांच्याविरोधात तक्रार केली आणि त्यांना हाकलून दिलं, हीच तत्परता परप्रांतियांविरोधात का दाखवली जात नाही,'' असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवरही निशाणा साधला.

भाषणाचा व्हिडीओ :

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: do whatever you want but Nanar project won\'t be in Konkan says raj thackeray
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV