स्थानिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे पारसिकजवळ मालगाडीचे डबे घसरले

स्थानिकांनी कचरा टाकून तयार केलेल्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये रुळ अक्षरशः गायब झाला आहे.

स्थानिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे पारसिकजवळ मालगाडीचे डबे घसरले

ठाणे : काल ठाणे-दिव्यादरम्यान पारसिक बोगद्याजवळ मालगाडीचा डबा घसरला आणि कामावरुन घरी परतणाऱ्या लाखो मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र कालची दुर्घटना ही रेल्वे रुळावरच्या कचऱ्यामुळे घडल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे रेल्वे रुळाला डम्पिंग ग्राऊंड करणाऱ्यांवर कारवाई कधी करणार, असा सवाल विचारला जात आहे.

बुधवारी दुपारी ठाणे-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान पारसिक बोगद्याजवळ मालगाडीचा डबा घसरला आणि मध्य रेल्वे ठप्प झाली. साहजिकच याचा फटका ऑफिसमधून घरी निघालेल्या लाखो मुंबईकरांना बसला.

खोळंबलेले प्रवासी रेल्वे प्रशासनाच्या नावानं लाखोल्या वाहत रखडत रखडत घरी पोहोचले. मात्र प्रत्यक्षात मालगाडीचा डबा घसरला तो रेल्वे रुळावर जमा झालेल्या कचऱ्यामुळे.

मालगाडीचा घसरलेला डबा हटवला, मध्य रेल्वे पूर्वपदावर


स्थानिकांनी कचरा टाकून तयार केलेल्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये रुळ अक्षरशः गायब झाला आहे. पारसिक बोगदा परिसरात उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्या, तिथल्या लोकांकडून टाकला जाणारा कचरा आणि कारवाईचा चेंडू एकमेकांच्या कोर्टात टोलवणारं रेल्वे आणि पालिका प्रशासन.

या सगळ्या चक्रव्यूहात भऱडला जातो तो मध्य रेल्वेनं प्रवास करणारा तुमच्या-आमच्यासारखा सामान्य प्रवासी. कालच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने रुळावरचा कचरा उचलायला सुरुवात केली आहे, मात्र ही झाली तात्पुरती कारवाई.

जोपर्यंत मध्य रेल्वेच्या रुळाभोवती उभ्या राहिलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांवर बुलडोझर चालत नाही तोपर्यंत अशा दुर्घटना घडतच राहणार, हे सांगण्यासाठी कोणत्या तज्ज्ञांची गरज नाही

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Garbage is the real reason behind goods train derailment near diva- parsik latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV