मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना नमन करणं हा सर्वोच्च क्षण: हार्दिक पटेल

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हार्दिक पटेलने एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. यावेळी हार्दिक पटेलने विविध मुद्द्यांना स्पर्श केला.

मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना नमन करणं हा सर्वोच्च क्षण: हार्दिक पटेल

मुंबई: गेल्या तीन वर्षात माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण कोणता असेल, तर तो म्हणजे ‘मातोश्री’वर जाऊन बाळासाहेब ठाकरेंना नमन करणं होय, असं पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने सांगितलं.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हार्दिक पटेलने एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. यावेळी हार्दिक पटेलने विविध मुद्द्यांना स्पर्श केला.

गेल्या तीन वर्षातील हार्दिक पटेलच्या आयुष्यात सर्वोच्च क्षण कोणता, असा प्रश्न हार्दिक पटेलला विचारण्यात आला. त्यावर हार्दिक पटेल म्हणाला, “ ‘मातोश्री’वर जाऊन  बाळासाहेब ठाकरेंना नमन करणं, हा सर्वोच्च क्षण होता”.

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जाणार का असाही प्रश्न हार्दिकला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “मातोश्री परिवाराशी माझे चांगले संबंध आहेत, याचा अर्थ मी त्यांच्यासोबत जाणार असा नाही”.

मराठा आरक्षणाला पाठिंबा

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाबाबतही हार्दिक पटेलने मत व्यक्त केलं. “मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे.  मराठा समाजातील 5-50 लोक श्रीमंत आहेत, त्यांची मुंबईत घरं आहेत, याचा अर्थ सगळे मराठे श्रीमंत आहेत असा होत नाही. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था पाहा, त्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. मराठा समाजातही मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. त्यामुळे रोजगार आणि शिक्षणासाठी आरक्षणाची मागणी होत आहे. त्यामुळेच माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे”, असं हार्दिकने नमूद केलं.

जिसकी संख्यादारी, उतनी भागीदारी

‘जिसकी संख्यादारी, उतनी भागीदारी’, या तत्वानुसार जाट, गुर्जर, पटेल आणि मराठा यांना आरक्षण मिळायलाच हवं, असं हार्दिक पटेल म्हणाला.

जाट, गुर्जर, पटेल आणि मराठा सर्व एकत्र येऊन चांगलं काम करु, त्यासाठी मी महाराष्ट्रात पण येणार आणि मराठा आंदोलनात सहभागी होणार, असं हार्दिक पटेलने सांगितलं.

जनतेला त्यांचे अधिकार मिळायला हवेत

जनतेला त्यांचे अधिकार मिळायला हवेत, त्यासाठीच जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे. त्यामुळेच आरक्षणाचा अधिकार त्यांना मिळायला हवा. अधिकार केवळ आरक्षणाचाच नाही तर तरुणांना रोजगाराचा अधिकार, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा अधिकार आणि गोरगरिबांना शिक्षण, रोजगाराचा अधिकार हवा, असं हार्दिक म्हणाला.

नोटाबंदी, जीएसटी रात्रीत लागू करता, मग आरक्षण का नाही?

आरक्षणाची मागणी का होत आहे याचा विचार सरकारने करायला हवा. जाट, गुर्जर, पटेल आणि मराठा यांचा पिंड शेतीचा आहे. सध्या शेतीची अवस्था काय आहे हे पाहून आरक्षणाची मागणी वाढली आहे. मात्र कायद्याचं कारण देत आरक्षणाला नकार देत आहेत. पण नोटाबंदी, जीएसटी रात्रीत लागू करता, मग आरक्षण का लागू करत नाही? हा एक-दोन हजार लोकांचा नव्हे तर कोट्यवधी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे, असं हार्दिक पटेल म्हणाला.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Hardik Patels exclusive interview, talked about Shivsena, Balasaheb Thackeray, Maratha reservation & many more
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV