कोकण किनारपट्टीला ओखी वादळाचा फटका, समुद्राला उधाण

कोकण किनारपट्टीतल्या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

By: | Last Updated: 04 Dec 2017 10:28 AM
कोकण किनारपट्टीला ओखी वादळाचा फटका, समुद्राला उधाण

मुंबई : केरळ आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घालणाऱ्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम कोकण आणि महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यांवर जाणवू लागला आहे. मुंबईसह कोकणातल्या समुद्रांनी काल रात्री रौद्ररुप धारण केलं.

कोकण किनारपट्टीतल्या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या सुचनेनुसार, आजपासून 6 तारखेपर्यंत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

UPDATE :

  • रायगड - ओखी वादळाचा फटका रायगड समुद्रकिनाऱ्याला बसला आहे. उरण समुद्रकिनारी 4 ते 5 छोट्या बोटी बुडाल्या. सुदैवाने बोटीत कुणीही नव्हतं. काल रात्रीची ही घटना आहे. बुडालेल्या बोटी परत किनाऱ्यावर आणल्या आहेत. एक बोट माणकेश्वर किनाऱ्यावर बुडाली. किनाऱ्यावरील बोटी आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्या आहेत.

  • रायगड - उरण ते मुंबई दरम्यानची प्रवासी लाँच सेवा बंद, ओखी वादळाच्या इशाऱ्याने सेवा बंद करण्याचा निर्णय


रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि मुंबई किनारपट्टीतही सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे. या सगळ्या ठिकाणी पुढच्या 48 तासात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहिल. खासकरुन 4 आणि 5 डिसेंबरला मुंबई लगतच्या अरबी समुद्राला ओखी वादळाच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई आणि कोकणात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्राला उधाण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ओखी वादळाचा परिणाम पाहायला मिळत आहे. मालवण, वेंगुर्ले, देवगड समुद्र किनाऱ्यावर तडाखा बसला आहे. कोचरा-देवबागला समुद्राचं पाणी वस्तीत घुसलं. किनाऱ्यावरील मच्छीमार बांधव आणि स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर मालवण तालुक्यातील आचरा, मेढा, दांडी, किनारपट्टीलाही समुद्राच्या उधाणाचा तडाखा बसलाय. पिरावाडी गावाशी संपर्क तुटलाय तर देवबागमध्ये कुर्लेवाडीत पाणी घुसलंय.

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात समुद्राचं पाणी

रत्नागिरीतही अनेक किनारपट्टीच्या भागात समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या भागात घुसलं आहे. पावसाळ्यात जितकं पाणी चढतं तेवढं पाणी किनाऱ्याच्या भागात चढलं आहे. त्याचबरोबर लाटांचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळे किनारपट्टीवरच्या भागातील गावांना अतिसतर्कतेचा इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी स्थानिकांनी रस्त्यांवर गर्दीही केल्याचं पाहायला मिळतंय.

गोव्यात समुद्रात बुडालेल्या दोन पर्यटकांना वाचवण्यात यश

ओखी वादळाचा फटका आता गोव्यामध्ये बसू लागला आहे. कारण खवळलेल्या समुद्रात बुडताना दोन महिला पर्यटकांना वाचवण्यात आलं आहे. दक्षिण गोव्यातल्या प्रसिद्ध पाळोळे बीचवर दोन आयरिश महिला समुद्रात उतरल्या होत्या. पण वादळी वाऱ्यांमुळे समुद्र खवळला आणि समुद्राचं पाणी किनाऱ्याला ओलांडून पुढे आलं.

त्यामुळे समुद्रात उतरलेल्या दोन्ही महिला खोल समुद्रात जाऊ लागल्या. पण स्थानिकांच्या ही घटना वेळीच लक्षात आल्यानंतर त्या दोन्ही महिलांना वाचवण्यात आलं. दरम्यान ओखी वादळामुळे स्विमथॉन स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी आलेल्या 700 स्पर्धकांची निराशा झाली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: high tides in Konkan sea shore due to cyclone ockhi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV