अहमदाबादेत पतंग उडवण्यापेक्षा, श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवा : उद्धव ठाकरे

सरदार वल्लभभाई पटेल नुसते बोलणारे नव्हते, त्यांनी काश्मीर-पाकिस्तान-बांगलादेशचा प्रश्न मिटवला असता, असा टोला उद्धव ठाकरेंनी मोदींना लगावला.

अहमदाबादेत पतंग उडवण्यापेक्षा, श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवा : उद्धव ठाकरे

मुंबई : जगभरातील पंतप्रधानांसोबत अहमदाबादेत पतंग उडवण्यापेक्षा, लाल चौकात नेऊन तिरंगा फडकवला असता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अभिमान वाटला असता. केवळ 56 इंचाची छाती असून उपयोग नाही, त्यात किती शौर्य आहे, हे महत्त्वाचं आहे, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींसह भाजपवर हल्लाबोल केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

सरदार वल्लभभाई पटेल नुसते बोलणारे नव्हते, त्यांनी काश्मीर-पाकिस्तान-बांगलादेशचा प्रश्न मिटवला असता, असा टोला उद्धव ठाकरेंनी मोदींना लगावला.

गडकरींचं वक्तव्य संतापजनक
नितीन गडकरी यांनी नौदलाबाबत केलेलं वक्तव्य संतापजनक आहे. नेव्हीने सीमेवर जावं, हे नितीन गडकरींचं वक्तव्य ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली, असं उद्धव म्हणाले.
मुंबईत तरंगत्या हॉटेल्सना नेव्हीने परवानगी नाकारली होती. त्यावेळी गडकरींनी तुमचं काम सीमेवर आहे, इकडे नाही, असं नेव्हीला उद्देशून म्हटलं होतं. त्याचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला.

सर्व राज्यात निवडणूक लढवणार
यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सर्व राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेलच, पण यापुढे सर्वच राज्यात शिवसेना उमेदवार देईल. आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरु, किती मतं पडतील माहित नाही, पण आम्ही लढू असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हिंदू मतांमध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून इतर राज्यात निवडणुका लढवल्या नाहीत, पण यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढवणार, असं त्यांनी नमूद केलं.

शिवसेना लोकसभा, विधानसभा स्वबळावर लढणार!

गाय मारणं पाप, थाप मारणंही पापच
गाय मारणं जसं पाप आहे, तसंच थाप मारणंही पाप आहे. गोहत्याबंदी केली तशी थापाबंदी करा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. भाजप सरकार हे थापा मारुन, लोकांना भूलवून सत्तेत आलं आहे. त्यामुळे मोदी हे बोलाची कडी, बोलाचाच भात आहे, असं उद्धव म्हणाले.

...तर भाजप गुजरातमध्ये हरलं असतं
गुजरातमध्ये प्रादेशिक पक्ष असता, तर जनतेने भाजप-काँग्रेसऐवजी त्यांना पसंती दिली असती. भाजपचा पराभव झाला असता, असा दावा उद्धव यांनी केला. गुजरातच्या निवडणुकांमध्ये पाकिस्तानची आठवण झाली, त्यांचा काय संबंध? असा सवाल उद्धव यांनी केला.

चंद्रकांतदादांना अमित शहांमुळे लॉटरी
अमित शाहांमुळे चंद्रकांतदादांना लॉटरी लागली. त्यांनी कर्नाटकबाबत केलेलं वक्तव्य चीड आणणारं आहे. कानडी भाषेचा अनादर नाही, मात्र माझ्या मातृभाषेचा अनादर करुन इतरांचा सन्मान नाही, आम्ही कानडी अत्याचाराचा विरोध करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अदृश्य हात तोडू
कोरेगाव-भीमामधील घटना मन विषण्ण करणारी आहे. हिसांचाराच्या घटनेमागे अदृश्य हात असल्याचं काही जण म्हणतात. मात्र हिंसाचार करणारे हात तोडल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव यांनी ठणकावलं.

शिवसेनेची नवी कार्यकारिणी
या बैठकीत शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यंदा नेतेपदी पाच नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली. यामध्ये आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे.

शिवसेनेचे एकूण 13 नेते असतील
•    मनोहर जोशी
•    सुधीर जोशी
•    लीलाधर ढाके
•    दिवाकर रावते
•    संजय राऊत
•    रामदास कदम
•    गजानन कीर्तीकर
•    सुभाष देसाई

नवीन नियुक्ती
•    आदित्य ठाकरे
•    एकनाथ शिंदे
•    चंद्रकांत खैरे
•    आनंदराव अडसूळ
•    अनंत गीते
शिवसेना सचिव - मिलिंद नार्वेकर, सूरज चव्हाण.
प्रवक्ते - अरविंद सावंत, निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, अमोल कोल्हे, अनिल परब

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Instead flying kites in Ahmedabad, hoist flag in Lal Chauk, says Uddhav Thackeray
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV