जेट एअरवेजच्या विमानात भांडणाऱ्या वैमानिक दाम्पत्याचं निलंबन

डीजीसीएने पुरुष वैमानिकाचा उड्डाण परवाना रद्द केला आहे.

जेट एअरवेजच्या विमानात भांडणाऱ्या वैमानिक दाम्पत्याचं निलंबन

मुंबई : हजारो फूट उंचावर विमानात भांडून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या पायलट पती-पत्नीचं निलंबन करण्यात आलं आहे. 1 जानेवारीला लंडनहून मुंबईला येणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानातील कॉकपिटमध्येच पायलट दाम्पत्यात वाद रंगला होता.

'1 जानेवारी 2018 रोजी 9W119 लंडन-मुंबई या विमानात घडलेल्या प्रकारानंतर दोन्ही कॉकपिट क्रूची सेवा तातडीने निलंबित करण्यात आली आहे' असं जेट एअरवेजने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. डीजीसीएने पुरुष वैमानिकाचा उड्डाण परवाना रद्द केला आहे.

काय आहे प्रकरण?

1 जानेवारीला संबंधित वैमानिक पती-पत्नी जेट एअरवेजचं 9W119 लंडन-मुंबई विमान चालवत होते. त्यावेळी दोघांमध्ये घरगुती कारणावरुन वाद रंगला आणि पतीने अचानक पत्नीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे महिला वैमानिक कॉकपिटमधून रडत बाहेर आली.

पायलटच्या डोळ्यात अश्रू पाहून केबिन क्रूही आश्चर्यचकित झाले. पुरुष वैमानिकाने आपल्याला कानशिलात लगावल्याचं तिने सांगितलं. तिच्या पाठोपाठ पुरुष वैमानिकही तिची समजूत काढण्यासाठी बाहेर आला आणि क्षणभरात सर्वांचे धाबे दणाणले. कॉकपिटमध्ये काही कालावधीसाठी पायलट नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे सर्वांच्या मनात भीती चमकून गेली.

उडत्या विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलट पती-पत्नीचं घरगुती भांडण


दोघांना केबिन क्रूने पुन्हा कॉकपिटमध्ये पिटाळलं. केबिन क्रूचा जीव भांड्यात पडला, पण पहिला वाद शमतो न शमतो, तोच महिला वैमानिक पुन्हा रडत बाहेर आली. तिची कशीबशी समजूत घालण्यात आली. तिला कॉकपिटमध्ये पिटाळलं. अखेर विमान जेव्हा मुंबई विमानतळावर सुरक्षितरित्या उतरलं, तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

'पायलट आणि सहपायलटमध्ये गैरसमजूतीतून वाद झाला. हा वाद सोडवण्यात आला. विमान सुरक्षितरित्या मुंबई विमानतळावर उतरवण्यात आलं' अशी माहिती जेट एअरवेजने हा प्रकार समोर आल्यानंतर दिली होती. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही पायलटना डीजीसीएने तात्पुरतं हवाईसेवेपासून निलंबित केलं होतं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Jet Airways fires pilot couple who fought mid-air on London-Mumbai flight latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV