केडीएमसी नगरसेवकांना 'टॅब'चे डोहाळे, 25 लाखांचा वायफळ खर्च?

शिवाय प्रत्येक नगरसेवकाच्या हातात आयफोन किंवा महागडे स्मार्टफोन असताना पालिकेने हा घाट नेमका कशासाठी घातलाय? असा सवाल सध्या विचारण्यात येत आहे.

केडीएमसी नगरसेवकांना 'टॅब'चे डोहाळे, 25 लाखांचा वायफळ खर्च?

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांसाठी 'टॅब' खरेदी करण्याचा घाट सध्या प्रशासनाने घातला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेची सूचना, अजेंडा, इतिवृत्त, प्रस्ताव, ठराव आदी गोष्टी सॉफ्ट कॉपी स्वरुपात नगरसेवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या 'टॅब'चा उपयोग होणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

केडीएमसीत सध्या 127 नगरसेवक असून त्यांच्यासाठी सॅमसंग कंपनीचे प्रत्येकी 20 हजार रुपयांचे टॅब घेण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल 25 लाख रुपयांपेक्षाही जास्त खर्च अपेक्षित आहे. या खरेदीबाबत प्रशासनाने सर्व नगरसेवकांना पत्र पाठवली असून पालिकेचा टॅब घ्या, अथवा पालिकेकडून पैसे घेऊन तुमच्या आवडीचा टॅब घ्या, असे पर्याय देण्यात आले आहेत.

सध्या केडीएमसीच्या तिजोरीत खडखडाट असून नगरसेवकांचा निधीही 35 लाखांवरुन 15 लाखांवर आणण्यात आला आहे. त्यात विकासकामं होत नसल्याची ओरड नगरसेवक करत असताना टॅबचा हा वायफळ खर्च कशाला असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. शिवाय प्रत्येक नगरसेवकाच्या हातात आयफोन किंवा महागडे स्मार्टफोन असताना पालिकेने हा घाट नेमका कशासाठी घातलाय? असा सवाल सध्या विचारण्यात येत आहे.

या खरेदीला मनसेने विरोध केला असून तसं पत्रही प्रशासनाला दिलं आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या टॅब खरेदीला आतापर्यंत अनेक नगरसेवकांनी सहमती दर्शवल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे केडीएमसी नगरसेवकांना जनतेच्या पैशातून फुकटचे टॅब घेण्याचे डोहाळे लागल्याची टीका केली जात आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kalyan Dombivali Municipal Corporation to buy Tab for corporators
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV