कमला मिल आग: 5 अधिकारी निलंबित

पालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

कमला मिल आग: 5 अधिकारी निलंबित

मुंबई: कमला मिल अग्नितांडवात 14 बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. पालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. कमला मिलच्या परवानग्यांशी संबंधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई - जी साऊथ वॉर्ड ऑफिसर सपकाळे यांची तडकाफडकी  बदली करण्यात आली. तर अन्य पाच इंजिनिअर्स आणि अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आहे.

निलंबित अधिकारी

  • मधुकर शेलार पदनिर्देशित अधिकारी

  • धनराज शिंदे ज्युनिअर इंजिनियर

  • महाले सब इंजिनिअर

  • पडगिरे - वैद्यकीय आरोग्य अधिकारी

  • एस. एस. शिंदे -अग्निशमन अधिकारी


सामाजिक कार्यकर्त्याची तक्रार

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते इलियास इजाज खान यांनी 1 Above हॉटेलची सात महिन्यांपूर्वीच तक्रार केली होती. यानंतर आरोग्य विभागाने इथे तपासणी करुन अहवाल सादर केला होता. यामध्ये अवैधपणे हॉटेल बनवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

आरोग्य विभागाचे निरीक्षक पी एम शिर्के यांनी 1Above हॉटेलमालक कृपेश संघवी यांना जुलैमध्ये नोटीस पाठवण्यात आली होती. यामध्ये हॉटेलचा अनधिकृत भाग 7 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही हॉटेल अवैधरित्या चालूच होतं.

इलियास इजाज खान यांच्या मते त्यांनी मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त आणि सर्व संबंधित विभागाकडे तक्रार केली होती. सर्वांकडून कारवाईचं आश्वासन मिळालं, मात्र कारवाई झालीच नाही.

जी साऊथ वॉर्डच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळेच ही भीषण दुर्घटना घडल्याचा आरोप इलियास यांनी केला.

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण?

हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे.

आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kamla Mills Compound Fire : 5 BMC officers suspended
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV