हवा हवाई ते निंबुडा निंबुडा, कविता कृष्णमूर्ती यांची जबरदस्त गाणी

कविता कृष्णमूर्ती यांचा आज जन्मदिवस.

हवा हवाई ते निंबुडा निंबुडा, कविता कृष्णमूर्ती यांची जबरदस्त गाणी

मुंबई: नव्वदच्या दशकात आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका कविता कृष्णमूर्ती यांचा आज जन्मदिवस. 25 जानेवारी 1958 रोजी दिल्लीत जन्मलेल्या कविता कृष्णमूर्ती आज वयाची साठी पूर्ण करत आहेत.

भारतीय शास्त्रीय संगीत आणि कर्नाटक संगीतात त्यांनी महारथ गाठला आहे.

तमिळी कुटुंबात जन्मलेल्या कविताचं बालपण खूपच रंजक होतं. कविता यांच्या घरासमोर एक बंगाली कुटुंब राहात होतं. या कुटुंबासोबत कविता यांच्या कुटुंबाचं जिवलग मैत्रीचं नातं होतं.

शेजाऱ्यांवर इतकं प्रेम होतं की कविता यांच्या वडिलांना मोठं घर मिळालं तेव्हा ही दोन्ही कुटुंबं त्या एकाच घरी राहू लागली.

दक्षिण भारतात प्रत्येक घराचा गाणं/संगीताशी संबंध असतोच. शिवाय बंगाली कुटुंबांनाही संगीत प्रिय असतं. त्यामुळे कविता कृष्णमूर्ती यांचं बालपण गाणं, संगीत यातच गेलं.

हेमा मालिनी शेजारी

कविता कृष्णमूर्ती यांच्या लहानपणीची आणखी एक रंजक बाब म्हणजे, त्यांच्या शेजारी हेमा मालिनीही राहात होत्या. त्याकाळी त्या भरतनाट्यम शिकत होत्या. त्यामुळे कविता यांनाही नृत्य शिक्षण देणं सुरु झालं. मात्र त्यामध्ये त्यांना रस नसल्याने त्यांनी मध्येच बंद केलं.

त्यानंतर त्यांनी संगीतावरच भर दिला. पुढे कविता कृष्णूर्ती दिल्लीवरुन मुंबईत आल्या. त्यांनी मुंबईत संगीताचे धडे गिरवले.

कॉलेजमध्येच गाण्याची ऑफर

कविता ज्या कॉलेजमध्ये शिकत होत्या, तिथे अनेक सेलिब्रिटींची मुलंही शिकत होती. कॉलेजमधील एका कार्यक्रमात कविता यांचं गाणं अमीन सयानी आणि हेमंत कुमार यांनी ऐकलं. गाणं ऐकताच हेमंत कुमार यांनी कवितांना आपल्यासोबत गाण्याची ऑफर दिली. तर अमीन सयानी यांनी सी. रामचंद्र यांच्याकडे जाण्यास सांगितलं. मात्र रामचंद्र यांनी कविता यांना दहा वर्षांनी आपल्याकडे येण्यास सांगितलं.

यानंतर हेमंत कुमार यांनी थेट मन्ना डे यांना फोन करुन कविता यांच्या आवाजाचं कौतुक केलं. मग मन्ना डे यांनी कविता यांना दुसऱ्या दिवशीच राजकमल स्टुडिओत येण्यास सांगितलं.

लतादीदींना पाहून अवाक्

राजकमल स्टुडिओत गेल्यावर कविता कृष्णमूर्ती यांच्यासमोर थेट गाणसम्राज्ञी लता मंगशेकर उभ्या होत्या. त्यांना पाहून कविता कृष्णमूर्ती हरखून गेल्या. त्यांना काय करावं आणि काय नाही कळतच नव्हतं.

कविता यांना गाणं गायला सांगितलं, पण लतादीदींना पाहून त्या गाणंच विसरलं. पुढे लतादीदींनी त्यांना धीर दिला आणि कविता यांनी फायनल टेक गायला. ते बंगाली गाणं होतं. कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं ते पहिलं गाणं होतं.

या गाण्यानंतर सुरु झालेला कविता यांचा प्रवास अविरत चालू आहे.

‘प्यार झुकता नही’ मधील तुमसे मिलकर ना जाने क्यों या गाण्याने कविता कृष्णमूर्तीला ओळख दिली. मग मिस्टर इंडियामधील गाणी तर प्रचंड गाजली. हवा हवाई, करते है प्यार हम ...ही गाणी आजही गुणगुणली जातात.

प्यार हुआ चुपके से या गाण्याने त्यांनी यशाचं शिखर गाठलं

कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली आणि गाजलेल्या गाण्यांची यादी खूप मोठी आहे. त्यापैकी काही गाणी

  • निंबुडा निंबुडी (हम दिल दे चुके सनम)

  • ना जाने कहांसे आई है (चालबाज)

  • डोला रे डोला (देवदास)

  • आज मै उपर आसमां नीचे (खामोशी)

  • प्यार हुआ चुपके से (1942 अ लव्ह स्टोरी)

  • मेरे दो अनमोल रतन (राम लखन)
सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: kavita krishnamurthy birthday special
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV