शेतकऱ्यांचं लाल वादळ आझाद मैदानावर धडकलं

आज पहाटे पाचच्या सुमारास किसान सभेचं लाल वादळ आझाद मैदानावर धडकलं.

शेतकऱ्यांचं लाल वादळ आझाद मैदानावर धडकलं

मुंबई: विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघालेला किसान सभेचा मोर्चा आझाद मैदानात दाखल झाला आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास किसान सभेचं लाल वादळ आझाद मैदानावर धडकलं.

सोमय्या मैदानातून रात्री उशीरा मोर्चेकऱ्यांनी आझाद मैदानाकडे कूच केली. परीक्षांच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोर्चेकऱ्यांनी रात्रीत कूच करण्याचा निर्णय घेतला.

आज दहावी आणि बारावीचा पेपर असल्याने लाखो विद्यार्थ्यांना तो पेपर देण्यासाठी सुरळीतपणे परीक्षा केंद्रांपर्यंत जाता यावे, यासाठी वाहतुकीचा कोणताही खोळंबा होणार नाही, यादृष्टीने आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ते आंदोलकांनी मान्य केलं.

शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांसाठी सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री

दरम्यान, पाहटे आझाद मैदानात जाऊन सरकारचे प्रतिनिधी म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. मुंबईकरांची कोंडी टाळण्यासाठी शेतकरी भल्या पहाटेच आझाद मैदानाकडे निघाले, त्याबाबत त्यांचं आभार मानावं तितकं कमी आहे, असं महाजन म्हणाले.


आझाद मैदानात भव्य सभा

आज आझाद मैदानात मोर्चेकऱ्याची भव्य सभा होणार आहे.  किसान सभेचे आणि कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय नेते सभेत सहभागी होणार आहेत. आज संध्याकाळी कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सिस्ट) नेते खासदार सीताराम येचुरी आणि ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष आमरा राम सभेला संबोधित करणार आहेत.

गेल्या महिन्यात आमरा राम यांनी राजस्थानमधल्या मोठ्या किसान आंदोलनाचं नेतृत्व करत राजस्थान ठप्प केलं होतं. त्यानंतर ते आता राज्याची राजधानी मुंबईत शेतकऱ्यांच्या सभेला संबोधित करणार आहेत.

सरकारकडून समिती स्थापन

मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या समितीत एकूण 6 मंत्री असतील. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख यांचा या समितीत समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती मोर्चेकऱ्यांच्या प्रतिनिधींशी आज दुपारी 12 वाजता चर्चा करणार आहे.

सरकार सकारात्मक

किसान सभा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची उच्चस्तरीय बैठक काल रात्री वर्षा निवासस्थानी घेतली. या बैठकीत सरकार आंदोलकांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं.

गिरीष महाजनांसोबत प्राथमिक चर्चा

लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नाही, मागण्या मान्य होईपर्यंत विधानभवनाला घेराव घालणार, असा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यावर, लिखित आश्वासनाच्या मागणीवर चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल, असा विश्वास महाजनांनी व्यक्त केला.

मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत शेतकरी नेत्यांची प्राथमिक चर्चा झाली. अजित नवले, अशोक ढवळे, शेकापचे जयंत पाटील, कपिल पाटील, जीवा गावित या बैठकीला उपस्थित होते.

सर्वपक्षीय पाठिंबा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे संध्याकाळी पाच वाजता सोमय्या मैदानावर किसान मोर्चातील शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. स्वत: राज ठाकरे यांनी किसान सभेचे सचिव अजित नवले यांना फोन करुन, पाठिंबा जाहीर केला होता. मुंबईत आल्यानंतर या लाँग मार्चमध्ये मनसैनिकही सहभागी होतील, असं राज ठाकरे यांनी सांगितल्याचं अजित नवले म्हणाले होते.

राज ठाकरे किसान मोर्चात सहभागी, शेतकऱ्यांशी संवाद


शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचा मनापासून पाठिंबा असल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं. सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी उभे राहतील. सामूहिक कार्यक्रम ठरल्यावर त्याच्या पाठीशी सातत्याने राहणार असल्याचं आश्वासन पवारांनी दिलं.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही ट्वीट करुन किसान लाँग मार्चला पाठिंबा जाहीर केला. मुलुंड टोलनाक्यावर काँग्रेसने शेतकऱ्यांचं स्वागत केलं.

'शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी निघालेल्या नाशिक मुंबई किसान लाँग मार्चला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या सरकारविरोधातील या संघर्षात काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून शेतकऱ्यांशी चर्चा करावी व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात.' असं चव्हाण म्हणाले.


आदित्य ठाकरेंची मोर्चेकऱ्यांशी चर्चा

कधी काळी डाव्यांचा जोरदार निषेध करणाऱ्या शिवसेनेने कम्युनिस्टांच्या नेतृत्वात निघालेल्या किसान मोर्चाला पाठिंबा दर्शवला. शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची हमी दिली.

ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अजित नवलेंची भेट घेऊन त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आपल्याला पाठिंबा जाहीर केला आहे, तसा निरोप घेऊन मी आल्याचं शिंदे म्हणाले, असं नवलेंनी सांगितलं होतं.

शिवसेनेपाठोपाठ राज ठाकरे यांच्या मनसेनेही किसान सभेच्या लाँग मार्चला पाठिंबा दिला होता. शेकाप नेते जयंत पाटीलही शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी झाले होते.

वाहतुकीत बदल

किसान लाँग मार्चमुळे मुलुंड ते सोमय्या मैदान- चुनाभट्टीपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांना पूर्व द्रुतगती मार्गावर बंदी घालण्यात आली आहे.

याच कालावधीमध्ये मुंबईहून ठाण्याला जाणारी अवजड व माल वाहतूक करणारी वाहने वाशी खाडीपूल, ऐरोली, विटावा मार्गे ठाणे अशी वळवण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांची पदयात्रा सुरु असताना एक मार्ग छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा असेल. मात्र यावेळी या वाहनांना वेगमर्यादा ताशी 20 कि.मी. ठेवण्याचे बंधन असणार आहे.

शेतकरी पदयात्रेच्या दरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने या मार्गाचा वापर करणे शक्यतो टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. त्याचबरोबर लालबहादूर शास्त्री मार्ग, सायन-पनवेल मार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग याचा वापर करावा अशी सूचनाही वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

मागण्या काय आहेत?

-संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, नद्या जोड प्रकल्पांचा प्रश्न, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना, बोंडअळी व गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न

-कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात

-शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्या

-शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या

-स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अमलबजावणी करा

-वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा

-पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून राज्यातील शेती समृद्ध करा

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांसाठी सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री

राज ठाकरे किसान मोर्चात सहभागी, शेतकऱ्यांशी संवाद

शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईच्या वेशीवर


राज ठाकरेंचा नवलेंना फोन, किसान लाँग मार्चला पाठिंबा

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kisan Long March reached Azad Maidan, Mumbai
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV