एसटी कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरुच

एसटी महामंडळ कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यातील बैठकीत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे एसटी संप सुरुच आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरुच

मुंबई: एसटी महामंडळ कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात काल रात्री उशिरा बैठक झाली. मात्र या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे बैठकीनंतर कदाचित एसटी सुरु होण्याची लागलेली आशा पुन्हा धुसर झाली आहे.

एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी संप मागे घेतला नसून तो यापुढेही सुरुच राहील, अशी माहिती दिली.

संघटनेनं सातवा वेतन आयोग आणि सेवा ज्येष्ठतेनुसार वेतनवाढ करण्यासाठी साडे 4 हजार 500 कोटींची मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र दिवाकर रावतेंनी सातव्या वेतन आयोगाला मिळता-जुळता प्रस्ताव कर्मचाऱ्यांसमोर ठेवला. त्यानुसार वार्षिक 1100 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं. त्याउपर एकही रुपया सरकारडून दिला जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं. पण हे एसटी कर्मचारी संघटनांना अमान्य आहे.

ST संपाविरोधात हायकोर्टात 2 याचिका, एकाच दिवशी सुनावणी

त्यामुळे रात्री झालेली बैठक निष्फळ ठरली असून आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही लालपरी संपावरच असणार आहे.

दरम्यान आज पुन्हा परिवहनमंत्र्यांसोबत चर्चा करुन यावर तोडगा काढण्याच्या तयारीत असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.

संदीप शिंदे काय म्हणाले?

“बैठकीत अद्याप तोडगा निघाला नाही. आम्ही सातवा वेतन आणि सेवा जेष्ठतेची मागणी केली होती. यासाठी साडे चार हजार कोटींची मागणी प्रशासनाकडे केली होती.

सातव्या वेतनाला मिळता जुळता प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला. यामध्ये 4 ते 7 हजारांची वेतन वाढीचा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला. मात्र, त्यातली वाढ कामगारांना मान्य होणार नसल्याने अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. आज परिवहनमंत्र्याच्या बैठकीत पुन्हा चर्चा करुन यावर तोडगा काढून, आम्ही एसटी कर्मचारी संघटना संप मागे घेण्याच्या तयारीत आहोत” असं संदीप शिंदे म्हणाले.

दिवाकर रावते काय म्हणाले?

“जास्तीत जास्त वाढ देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये 2.57 हजार कोटींचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. यापुढे सरकारकडून एक रुपयासुद्धा वाढवून दिला जाणार नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटना का अडून बसले हे माहीत नाही.  यापुढे कोणताही तोडगा निघणार नसून संप मागे घ्यावा असं मला वाटतं”

एसटी कर्मचाऱ्यांचा संप

सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर संपाचं हत्यार उपसलं आहे. मंगळवारी 17 ऑक्टोबरला मध्यरात्रीपासून संप सुरु केला. त्यामुळे दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.

राज्यभरातले अनेक एसटी डेपो बंद आहेत. एसटी ठप्प झाल्यानं पहिल्या दिवशी अनेक प्रवाशांची रात्र एसटी स्टॅण्डवर गेली.

एसटी संप : पुढील 25 वर्ष सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही : रावते


पुढची 25 वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे पैसाच नाही, असं म्हणत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी धुडकावून लावली आहे. शिवाय एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असून त्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोपही रावतेंनी केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 3 मागण्या :

  • एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा

  • पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी

  • जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा इतिहास

याआधी 1972 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा 12 दिवसांचा संप झाला होता. त्यावेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यानंतर 1996, 2007 सालीही संप झाले होते.

किती एसटी गाड्या, किती कर्मचारी संख्या?


  • राज्यात एसटीची कर्मचारी संख्या 1 लाख 2 हजार असून, एसटी बसची संख्या 17 हजार आहे.

  • दररोज 70 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात.

  • एसटीच्या आगारांची संख्या 258, विभागीय कार्यालयांची संख्या 31 आहे.


संबंधित बातम्या

ST संपाविरोधात हायकोर्टात 2 याचिका, एकाच दिवशी सुनावणी

'..तर एसटी कर्मचाऱ्यांच्या जागी कंत्राटी कामगार भरु'

कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन, प्रशासनाचा इशारा

एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर नाही, मग गुन्हे का?

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV