लाईट गेल्यानंतर कलावंतांनी मोबाईलच्या उजेडात नाटक पूर्ण केलं!

मराठी नाट्य कलावंतांच्या रंगभूमीबद्दल असणाऱ्या आदर आणि प्रेमाचं, तर प्रेक्षकांच्या प्रगल्भतेचं आणि संयमीपणाचं दर्शन यावेळी घडलं.

लाईट गेल्यानंतर कलावंतांनी मोबाईलच्या उजेडात नाटक पूर्ण केलं!

मुंबई : ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान ‘शो मस्ट गो ऑन’ या उक्तीचा प्रत्यय आला. नाटक सुरु असताना नाट्यगृहाची वीज गेली. त्यावेळी प्रेक्षकांनी आपापल्या मोबाईलची लाईट सुरु केली आणि नाटक सुरु ठेवण्याची विनंती केली. विशेष म्हणजे कलावंतांनीही मोबाईलच्या उजेडात नाटक पूर्ण केलं.

मराठी नाट्य कलावंतांच्या रंगभूमीबद्दल असणाऱ्या आदर आणि प्रेमाचं, तर प्रेक्षकांच्या प्रगल्भतेचं आणि संयमीपणाचं दर्शन यावेळी घडलं.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील परळमधील दामोदर हॉलमध्ये 2 ऑक्टोबरला अरविंद जगताप लिखित आणि दिग्दर्शित ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग होता. यावेळी दुसऱ्या अंकादरम्यान नाट्यगृहाची वीज गायब झाली. त्यानंतर नाटकाशी संबंधितांनी विजेबाबत नाट्यगृहाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. त्यामुळे वीज परत कधी येणार, याबाबत अस्पष्टता होती.

विशेष म्हणजे, यावेळी नाटक पाहण्यास आलेल्या प्रेक्षकांनी कोणत्याही प्रकारची तक्रार व्यक्त न करता आपल्या प्रगल्भतेचं दर्शन घडवलं. प्रेक्षकांनी मोबाईलच्या लाईट सुरु केल्या आणि नाटक सुरु करण्याचं कलाकारांना आवाहन केलं.

कलाकारांनीही मोबाईलच्या उजेडात नाटकाचा दुसरा अंक पार पाडला. यावेळी कलाकार आणि प्रेक्षकांनी ‘शो मस्ट गो ऑन’ ही उक्ती प्रत्यक्षात उतरवली.

मराठी नाट्यरसिकांनी ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ या नाटकाला दिलेली ही एकप्रकारे दादच म्हणायला हवी.
“मराठी प्रेक्षक असा दिलदार आहे. काल स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या आमच्या नाटकाच्या दुसर्या अंकात वीज गेली. अर्धा तास काहीच उत्तर मिळत नव्हतं. शेवटी प्रेक्षक म्हणाले आम्ही मोबाईलचे लाईट चालू करतो. तुम्ही प्रयोग करा. आणि दुसरा अंक प्रेक्षकांनी त्यांच्या मोबाईलच्या प्रकाशात पाहिला. आमच्या कलावंतांनी एवढी अप्रतिम उर्जा दाखवत प्रयोग सादर केला की लाईट नाही याचा विसर पडला. या अविस्मरणीय क्षणांनी कालचा रौप्य महोत्सवी प्रयोग साजरा झाला. या रसिकांना कधीच विसरू शकत नाही.” - अरविंद जगताप, लेखक-दिग्दर्शक, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी

19748709_10209767727690949_7406037154741562612_n

आपल्या आजूबाजूच्या घडामोडींवर, विषयांवर प्रखरपणे भाष्य करणारं हे नाटक आहे. विशेषत: महापुरुषांच्या दैवतीकरणाच्या मुद्द्यावर नाटकात विशेष भर देण्यात आला आहे. माणसांमधील ‘लिबर्टी’ हरवत जात असल्याची खंत शेवटी व्यक्त करण्यात आली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात काळजाला भिडणारे पत्र लिहिणाऱ्या अरविंद जगताप लिखित भिडणारे आणि विचार करायला भाग पाडणारे संवाद, हे या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV