अपघाताच्या सूडासाठी फ्रेण्ड रिक्वेस्ट, विद्यार्थ्याला टोळक्याची मारहाण

बाईकला चुकून धक्का लागल्यामुळे जखमी झालेल्या तरुणांनी कारचालक विद्यार्थ्याला फेसबुकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली आणि भेटायला बोलावलं. त्यानंतर गाडीत 30 मिनिटं बेदम मारहाण करण्यात आली.

अपघाताच्या सूडासाठी फ्रेण्ड रिक्वेस्ट, विद्यार्थ्याला टोळक्याची मारहाण

मुंबई : कारचा चुकून धक्का लागल्यामुळे जखमी झालेल्या बाईकस्वारांनी या घटनेचा खुनशी पद्धतीने नियोजनबद्ध सूड घेतला. कारचालक तरुणाला फेसबुकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून भेटायला बोलावलं आणि गाडीत 30 मिनिटं बेदम मारहाण करण्यात आली. मुंबईत 24 वर्षीय एमबीए विद्यार्थ्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला. पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

विक्रोळीला राहणारा जेहान दिवेचा 26 फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता घाटकोपरहून घरी चालला होता. आपल्या व्हॅगन आर गाडीचा धक्का अनवधानाने बाईकला लागला आणि मागे बसलेला तरुण खाली पडला. त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाल्याचं जेहानने सांगितलं.

'मी माफी मागितली मात्र दोघांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. मी कशीबशी सुटका करुन घेतली आणि पळ काढला' असं जेहानने पुढे सांगितलं.

दुसऱ्या दिवशी 'हर्षा जोशी' नामक तरुणीची फ्रेण्ड रिक्वेस्ट जेहानला आली. जेहानने तिच्यासोबत चॅटिंग केलं. 'तू एमबीए करतोस ना? एका मित्रामुळे मी तुला ओळखते' असं संबंधित तरुणीने जेहानला सांगितलं. थोडंफार बोलणं झाल्यावर दोघांनी पवईमध्ये भेटण्याचं ठरवलं.

'हिरानंदानी हॉस्पिटलजवळ आलास की एक चॉकलेट बार घे म्हणजे मी तुला सहज ओळखू शकेन' असं 'हर्षा'ने जेहानला सांगितलं. त्यानुसार, 28 तारखेला संध्याकाळी 6 वाजता जेहान ठरलेल्या जागी पोहचला. कार पार्क करुन मेडिकल स्टोअरमध्ये जाताना त्याला पाच जणांनी धरलं आणि होंडा सिटी कारमध्ये कोंबलं.

'कारच्या काचा टिंटेड होत्या. जवळपास 30 मिनिटं ही कार फिरवली जात होती आणि मला बुक्क्यांनी मारहाण सुरु होती. माझा श्वास घुसमटायला लागला. मी अस्थमाचा रुग्ण आहे आणि मला अस्थमा पंप न मिळाल्यास माझा मृत्यू होईल' असं जेहानने आरोपींना सांगितलं.

हे ऐकताच हल्लेखोर चिंतेत पडले आणि त्यांनी मेडिकलच्या दुकानाजवळ गाडी थांबवली. जेहानला अस्थमा पंप देऊन पुन्हा मारहाण सुरु करायची, असा त्यांचा इरादा होता. मात्र डॉक्टरांनी सुचवल्यानुसार पंप मिळाला नाही, तर माझा जीव जाऊ शकतो, अशी भीती जेहानने घातली.

जेहानचं बोलणं ऐकून हल्लेखोर चांगलेच धास्तावले. त्यांनी एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीजवळ कार थांबवली. जेहानकडे असलेले दोन मोबाईल आणि 22 हजार रुपयांची रोकड काढून घेण्यात आली. एका आरोपीने त्याला बाईकने पुन्हा हिरानंदानी हॉस्पिटलजवळ सोडलं. जेहान कसाबसा ड्राईव्ह करुन घरी पोहचला. आई-बाबांना हा प्रकार त्याने सांगितला. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

जेहानच्या डोळ्याला दुखापत झाली असून मेंदू आणि कानात रक्तस्राव झाला आहे. त्याच्यावर घाटकोपरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जेहानची ओळख आरोपींनी कशी पटवली आणि त्याला कसं शोधलं, हे अद्याप उलगडलेलं नाही. बाईकस्वारांनी त्याच्या कारचा नंबर शोधून रेकी केली असावी किंवा त्याचं आयकार्ड आरोपींच्या हाती लागलं असावं, असा कयास बांधला जात आहे.

सीसीटीव्ही कॅमेरा आणि जेहानने केलेल्या वर्णनाच्या आधारे 21 वर्षीय मास्टरमाईंड अनिकेत कांबळे, मुकेश वर्मा, देवेंद्र प्रधान, संतोष सरवदे, सागर कदम यांना अटक करण्यात आली.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: MBA student beaten up in car to take revenge of road rage in Mumbai
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV