म्हाडाच्या घरांसाठी आज सोडत, लॉटरीआधीच 12 अर्जदार विजेते

यंदा घरांच्या वाढलेल्या किंमती, तांत्रिक अडचणी आणि म्हाडाची ढासळती विश्वासार्हता यासारख्या कारणांमुळे म्हाडाच्या घरांना कमी प्रतिसाद मिळाला आहे.

म्हाडाच्या घरांसाठी आज सोडत, लॉटरीआधीच 12 अर्जदार विजेते

मुंबई : मुंबई : मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. म्हाडाच्या मुंबई विभागातील 819 घरांसाठी आज (10 नोव्हेंबर) सोडत जाहीर होणार आहे. या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातल्या घरांचा समावेश आहे.

विविध विभागातील 819 घरांसाठी 65,126 अर्जदार आज आपलं नशीब आजमावणार आहेत. वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात आज सकाळी दहा वाजता ही सोडत काढण्यात येईल.

यंदा म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किंमती, तांत्रिक अडचणी आणि ढासळती विश्वासार्हता यामुळे म्हाडाच्या घरांना नेहमीपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला आहे.

कुठे कुठे म्हाडाच्या सोडतीतील घरे ?

अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 8 घरं - प्रतिक्षा नगर, सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरीवली

अल्प उत्पन्न गटासाठी  एकूण 192 घरं - कन्नमवार नगर-विक्रोळी, चारकोप-कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थ नगर - गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी-मालाड

मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण 281 घरं - प्रतीक्षा नगर-सायन, सिद्धार्थ नगर-गोरेगाव (पश्चिम), उन्नत नगर-गोरेगाव (पश्चिम), चारकोप-कांदिवली (पश्चिम), गायकवाड नगर-मालवणी मालाड

उच्च उत्पन्न गटासाठी एकूण 338 घरं - लोअर परेल-मुंबई, तुंगा-पवई, चारकोप-कांदिवली (पश्चिम), शिंपोली-कांदिवली (पश्चिम)

2 कोटींच्या दोन घरांसाठी तब्बल 100 दावेदार

यंदा सर्वात जास्त चर्चा झालेली लोअर परेलमधील उच्च उत्पन्न गटातील 2 कोटींची दोन घरं कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे.

या 2 कोटींच्या घरांसाठी तब्बल 100 अर्ज आले आहेत. यांपैकी एक घर हे स्वातंत्र्य सैनिकांसाठी राखीव असून त्यासाठी 2 अर्ज आले आहेत. तर सर्वसामान्यांसाठी राखीव दुसऱ्या घरासाठी तब्बल 98 अर्ज आले आहे.

खरंतर दक्षिण मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात या घरांच्या किंमती नसल्याने बरीच टीकाही झाली होती. मात्र आता हे दोन कोटींचं घर कोणाला मिळतंय याची उत्सुकता वाढली आहे.

16 घरांना शून्य प्रतिसाद

यंदा म्हाडाच्या 819 पैकी 16 घरांना शून्य प्रतिसाद मिळाला. या 16 घरांसाठी एकही अर्ज आलेला नाही.
कारण या 16 घरांमध्ये अल्प आणि अत्यल्प गटांत आजी-माजी आमदार तसंच खासदारांनाही आरक्षण देण्यात आलं आहे.

अशा गटांतील 25 ते 50 हजारांपर्यंत उत्पन्न कोणत्याही आमदार किंवा खासदाराचं असणं शक्य नाही.  त्यामुळे या घरांना प्रतिसादच मिळालेला नाही.

यंदा आजी-माजी आमदार, खासदारांना मध्यम उत्पन्न गटांमध्ये आरक्षण देण्यात आलं होतं, मात्र त्यालाही प्रतिसाद मिळालेला नाही

या सोबतच, स्वातंत्र्यसैनिक, अंध, अपंग, म्हाडा कर्मचारी यांच्यासाठी आरक्षित असणाऱ्या घरांनाही अल्प, अत्यल्प गटांमध्ये शून्य प्रतिसाद मिळाला.

लॉटरीआधीच 12 अर्जदार विजेते

यंदा म्हाडाच्या घरांना मिळालेल्या अल्प प्रतिसादामुळे अनेक ठिकाणी केवळ एकच अर्ज प्राप्त झाला आहे. त्यामुळे कोणीही प्रतिस्पर्धी अर्जदार नसल्याने हे 12 जण विजेते ठरले आहेत.

दरम्यान, यंदा म्हाडाच्या घरासाठी शिंपोलीतील उच्च उत्पन्न गटातून अभिनेता आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा अभिनय बेर्डेनेही अर्ज केला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: MHADA Lottery today, zero response for 16 flats latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV